मुंबई : ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या प्रतिबंधित संघटनेचा माजी पदाधिकारी व दिल्ली-पडघा आयएसआयएस दहशतवादी मॉड्युल प्रकरणातील आरोपी साकीब अब्दुल हमीद नाचन (६३) याचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. नाचनचे वकील समशेर अन्सारी यांनी नाचन याच्या मृत्युच्या वृत्ताला दुजोरा दिला. नाचन हा तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असताना त्याला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्याला दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नाचन आयएसआयएसचा भारतातील प्रमुख’ म्हणजेच ‘अमीर-ए-हिंद’ असल्याचा आरोप आहे. त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. नाचन याने देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात आयएसआयएसची विचारसरणी पसरवण्यासाठी युवकांचे ब्रेनवॉश करून त्यांना संघटनेत भरती केले. तो संघटनेच्या विचारधारात्मक आणि तांत्रिक विस्तारासाठी कार्यरत होता, असा आरोप आहे.

दिल्ली-पाडघा आयएसआयएस दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात गेल्या वर्षभरात अनेक अटकसत्रे झाली आहेत. आयएसआयएस भारतात अत्यंत संघटीतरित्या काम करीत होती. ही यंत्रणा डिजिटलदृष्ट्या प्रगत आणि भारतात दहशतवादी कारवायांसाठी या संघनेकडून कट रचला जात होता. नाचनला आलेल्या ब्रेन स्ट्रोकबाबतची माहिती कुटुबियांना देण्यात आली होती. त्यानुसार त्यांचा मुलगा व जावई दिल्लीत दाखल झाले होते.

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) ठाणे जिल्ह्यातील पडघा परिसरातील बोरिवली गावात संशयित स्लीपर सेलवर लक्ष ठेऊन होते. त्याप्रकरणी छापाही टाकण्यात आला होता. या मॉड्यूलशी नाचन संबंधित होता. तपासात तलवारी, धारदार शस्त्रे, मोबाइल, अनेक सिम कार्ड्स, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, तसेच कथित दहशतवादी विचारसरणीचा प्रसार करणारे साहित्य जप्त करण्यात आले होते.

तपास यंत्रणांच्या मते, अटकेपूर्वीच नाचनने आपल्या नेटवर्कचा कारभार सुरू ठेवण्यासाठी अनेक विश्वसनीय सहकाऱ्यांची नियुक्ती केली होती. एटीएसने नाचनच्या निवासस्थानासह त्याच्या निकटवर्तीयांच्या घरी झडती घेतली होती. अनेक संशयित समर्थकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

तिहार तुरुंगातून नाचनला ताब्यात घेण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात प्रॉडक्शन वॉरंट दाखल करण्याच्या तयारीत एटीएस होती. पण त्यापूर्वीच त्याचे निधन झाले. नाचनला दोन मुलगे आहेत. त्यापैकी एक शमील सध्या महाराष्ट्रातील आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात तुरुंगात आहे. एनआयएच्या आरोपपत्रानुसार, साकीब नाचन उर्फ रवीश, साकीब किंवा खालिद हा आयएसआयएसचा भारतातील मुख्य नेतृत्व होता. त्याने कथितपणे आयएसआयएस संघनेत सामील होण्यापूर्वी शपथ विधी आयोजित करून त्याची चित्रफीत मोबाइलवर रेकॉर्ड केली आणि व्हीपीएन, ई-मेल्स, टेलिग्राम, स्नॅपचॅट व इतर ॲप्सच्या माध्यमातून परदेशी आयएसआयएस हँडलर्सना पाठवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साकीब नाचन हा सिमीचा माजी सदस्य आणि इंडियन मुजाहिदीनशी संबंधित असल्याचा आरोप होता. मुंबई सेंट्रल, विलेपार्ले आणि मुलुंड येथे २००२ आणि २००३ मध्ये झालेल्या स्फोटांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप झाला होता. त्यात सुमारे १२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात त्याला पोटा कायद्याअंतर्गत शस्त्रे बाळगल्याबद्दल दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१७ मध्ये तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर तो आपल्या गावी पाडघा येथे परतला. मात्र, पोलीस आणि तपास यंत्रणा त्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होती. एनआयएने २०२३ मध्ये दिल्लीतून आणि पडघा परिसरातून १५ संशयितांसह नाचनला अटक केली होती.