scorecardresearch

शिदे गटाची दसरा मेळाव्यासाठी चार हजार एसटींची मागणी? ; गाडय़ा आरक्षित केल्यास नियमित प्रवासी सेवा कोलमडण्याची भीती 

उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे,

शिदे गटाची दसरा मेळाव्यासाठी चार हजार एसटींची मागणी? ; गाडय़ा आरक्षित केल्यास नियमित प्रवासी सेवा कोलमडण्याची भीती 
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : दसरा मेळाव्याला शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिदे गटाने कंबर कसली असून मुंबईत मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांना आणण्यासाठी वाहने आरक्षित केली जात आहेत. त्यात एसटी गाडय़ांचेही समूह आरक्षण करण्यासाठी शिदे गटाचे आमदार आणि पदाधिकारी सरसावले आहेत. त्यांनी चार हजारांहून अधिक एसटी गाडय़ा आरक्षित करण्यासंदर्भात विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राज्याच्या सर्व जिल्ह्यांतून मुंबईतील दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिवसेनेच्या शिदे गटाने एसटी महामंडळाकडे ४ हजार १०० एसटी गाडय़ा देण्यासंदर्भात विचारणा केल्याचे सांगण्यात येते. मात्र मुळातच पुरेशा गाडय़ा उपलब्ध नसताना ऐन गर्दीच्या हंगामात एवढय़ा मोठय़ा संख्येने गाडय़ा आरक्षित केल्यास नियमित प्रवासी वाहतूक कशी करावी, असा प्रश्न एसटी महामंडळाला पडला आहे. 

उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे, तर शिदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली आहे. शिदे गट शक्तिप्रदर्शनाच्या तयारीला लागला आहेत. मेळाव्यासाठी अधिकाधिक  कार्यकर्ते आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शिदे गटातील नेते राज्याच्या विविध भागांतून खासगी बस आणि अन्य वाहने आरक्षित करत आहेत. त्याचबरोबर एसटी गाडय़ाही आरक्षित करण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनीही औरंगाबादमधील सिल्लोड आगारप्रमुखांकडे ३०० एसटी गाडय़ा आरक्षित करण्यासाठी अर्ज केला आहे. सर्व जिल्ह्यांतून मुंबईत येण्यासाठी ४ हजार १०० गाडय़ा उपलब्ध होऊ शकतात का, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. ठाण्याबरोबरच, पालघर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव यांसह अन्य भागांतून किती एसटी लागतील, याची माहितीही संबंधित आगारप्रमुखांना देण्यात आली आहे.

शिदे गटातील पदाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात येऊन मोठया प्रमाणात एसटी आरक्षित करण्याबाबत विचारणा केल्याचे सांगितले जाते. गाडय़ांच्या आरक्षणाबाबत शिदे गटाने अंतिम निर्णय महामंडळाला कळविलेला नाही, अशी माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.

महामंडळ द्विधा मन:स्थितीत

सणोत्सवांच्या काळात त्यातही दसऱ्याच्या दिवशी त्या-त्या भागांत एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होते. सध्या एसटीकडे १५ हजार ५०० गाडय़ा आहेत. त्यातील चार हजार गाडय़ा शिदे गटाला दिल्यास ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोयच नाही तर त्यांचे अतोनात हाल होऊ शकतात. त्यामुळे महामंडळ द्विधा मन:स्थितीत आहे. सध्या एसटीतून दररोज २८ लाख प्रवासी प्रवास करतात आणि त्यातून महामंडळाला १३ ते १४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या