गोरेगाव येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या जबानीतून एका हत्येची उकल झाली आहे. मार्च महिन्यात या टोळीने एका वाहनचालकाचे अपहरण करून त्याची हत्या केली होती. पोलिसांनी ही गाडी जप्त केली तेव्हा या टोळीने चक्क पोलीस ठाण्यातूनही ते वाहन पळविले होते.
वेल्लिपांडी हरिजन (२८) हा सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी. तोच या टोळीचा प्रमुख. मार्च महिन्यात या टोळीने मुंबई अहमदाबाद महामार्गावर मीरा रोड येथे एक इंडिका गाडी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने अडविली होती. नंतर गाडीचा चालक रितेश सिंह (२८) याची गळा आवळून हत्या केली होती आणि गाडी गोरेगाव येथे लपवून ठेवली होती. नंतर ती आरे सब पोलिसांनी बेवारस म्हणून ताब्यात घेतली होती. या गाडीवरील आपल्या हाताचे ठसे पाहून पोलीस आपल्याला पकडतील अशी भीती आरोपींना होती. त्यामुळे त्यांनी आरे सब पोलीस ठाण्यातूनही ही गाडी पळविली आणि ती धुऊन त्यावरील बोटांचे ठसे नष्ट केले होते. पुन्हा ही गाडी विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण वनराई पोलिसांनी ती गाडी जप्त केली होती.