मुंबई: राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवत असते. या योजनांची माहिती जनतेला देतानाच त्याचा लाभ पात्र लोकांना मिळवून देण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सातारा आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्रायोजिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

 जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, अर्ज कुठे, कसा करावा..कागदपत्रे काय जोडावीत..याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधत हा उपक्रम अभियानस्तरावर राबवून अद्याप शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थीना लाभ मिळवून देण्याचे आदेश दिले. बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, ग्रामविकासचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

 शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी एकाच छताखाली सर्व अधिकारी-जनता जत्रेच्या रूपात आणून, जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. यानुसार सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पथदर्शी उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांनिमित्त ३६ विभागामार्फत ७५ शासकीय योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थीना देण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 यामध्ये आणखी योजना वाढविण्यात येणार आहेत. या जत्रेनुसार एप्रिल महिन्यात सर्व विभागांनी आपापल्या योजनांची माहिती, शासन निर्णय याबाबत पूर्वतयारी करावी.  योजनानिहाय लाभार्थी निवड, त्यांचे अर्ज भरून घेणे याबाबतही तयारी करावी. योजनांचा लाभ मे महिन्यामध्ये देण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही श्रीवास्तव यांनी दिल्या.

उपक्रमाचे स्वरूप..

  • लाभार्थीना जलद, कमी कागदपत्रामध्ये आणि शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार असून तीन दिवस सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी राहणार आहेत.
  • यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे. जत्रेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना थेट जनतेशी संवाद साधता येणार आहे. यामुळे जनतेच्या समस्या जवळून पाहता येणार असल्याने त्या समस्येवर उपाययोजना करता येणार आहेत.
  • विविध योजनांसाठी पात्र असणाऱ्या आणि लाभ घेणाऱ्या लाभार्थीना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून लाभाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विविध योजनांसाठी पात्र लाभार्थीना योजना मंजुरीची पत्रे देण्याचा कार्यक्रम जिल्हावार लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे.