देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी (१६ मार्च) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर विद्याविहार ते भायखळा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ या वेळेत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत विद्याविहार ते भायखळा या दरम्यान सर्व गाडय़ा अप जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. त्या मुळे उपनगरी गाडय़ा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ येथे थांबतील आणि भायखळा येथून पुन्हा धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.  
पनवेल ते नेरळ अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १० वाजून ४३ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून २७ मिनिटांपर्यंत पनवेलहून सुटणाऱ्या सर्व अप हार्बर सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस ते नेरळ आणि ठाणे ते नेरळ दरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.