मुंबई : उपनगरांत मागील २४ तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून सांताक्रूझ येथे पावसाच्या नोंदीत वाढ झाली आहे. मात्र जुलै महिन्याच्या सरासपेक्षा अद्यापही पाऊस कमीच आहे.
सांताक्रूझ केंद्रात आतापर्यंत झालेल्या पावसाचा आकडा वाढत असला, तरी उर्वरित महिन्याच्या दिवसांत अपेक्षित प्रमाणात पाऊस पडेल का, याबाबत हवामान विभागाने अद्याप स्पष्ट अंदाज व्यक्त केलेले नाहीत. जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस अजून पडलेला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर शेवटच्या दिवसांत पडलेल्या पावसामुळे सरासरी गाठता आली. जुलै महिन्यातही हीच परिस्थिती आहे.
जुलै महिन्यात कुलाबा येथे ७७४.१ मिमी तर, सांताक्रूझ येथे ८५५.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते २१ जुलैपर्यंत १५४ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ३९९.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही केंद्रावरील आत्तापर्यंतची नोंद लक्षात घेता जुलै महिन्याची सरासरी पावसाला गाठता येईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारण सुरुवातीचे १५ दिवस मुंबईत फारसा पाऊस पडलेला नाही.
दरम्यान हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८:३० ते सोमवारी सकाळी ८:३० पर्यंत ११.२ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ११४.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या पडत असलेला पाऊस सलग दोन ते तीन दिवस पडत राहिला तर सरासरी गाठण्याची शक्यता आहे.
सरासरी गाठण्यासाठी ‘इतक्या’ पावसाची गरज
जुलै महिन्यात दोन्ही केंद्रावर मिळून १५८९.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा १ ते २१ जुलैपर्यंत दोन्ही केंद्रावर मिळून ५५३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्याची सरासरी गाठण्यासाठी अजून १०३६.३ मिमी पावसाची आवश्यकता आहे. जून महिन्यातही शेवटच्या दोन तीन दिवसांत पडलेल्या पावसामुळे सरासरी गाठता आली आहे.
गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक
यंदाच्या तुलनेत गतवर्षी दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात जुलै २०२४ मध्ये १४०१.८ मिमी तर , सांताक्रूझ केंद्रात १७०२.८ मिमी पावसाची नोंद झाली होती.
मे महिन्यात सर्वाधिक
यंदा मे महिन्यातच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली होती. १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा हवामानातील बदलांमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये मे महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पडलेला वळवाचा पाऊस आणि त्यानंतर लवकरच दाखल झालेला मोसमी पाऊस यामुळे संपूर्ण मे महिन्यात ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली.मे मध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मे दरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.