मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनसवर एका प्रवाशाकडून पैसे उकळल्याचा आरोप असलेल्या रेल्वे पोलिस दलाच्या (आरपीएफ) तीन जवानांना उच्च न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
गुन्हा दाखल झाल्यापासून राहुल भोसले (४७), ललित जगताप (५०) आणि अनिल राठोड (३७) हे फरारी आहेत. त्यांनी आधी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे, तिन्ही आरोपींनी वकील अनिकेत निकम यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती.
न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या एकलपीठापुढे या तिन्ही आरपीएफ पोलिसांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी, आपल्याला खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आले असून गुन्हा नोंदवण्यातील विलंब पोलिसांची संशयास्पद भूमिका स्पष्ट करतो, असा दावा आरोपी पोलिसांच्या वतीने करण्यात आला. तसेच, ते त्यांचे कर्तव्ये पार पाडत होते, असा सांगताना तक्रारीत नमूद केलेली घटना अतिशयोक्ती असल्याचेही याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांण्यात आले.
न्यायालयानेही आदेशात तक्रारीत नमूद घटना अतिशयोक्ती असल्याचे निरीक्षण नोंदवले व तिन्ही याचिकाकर्त्यांना २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. याचिकाकर्त्यांनी साक्षीदाराशी संपर्क साधू नये, तपास अधिकारी चौकशीसाठी बोलावतील तेव्हा उपस्थित राहावे, अशी अटही न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा देताना घातल्या.
काय प्रकरण ?
तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी सराफ असलेले राजस्थानस्थित तक्रारदार आठ वर्षांच्या मुलीसह मुंबई सेंट्रल टर्मिनस येथून दुरांतो एक्स्प्रेसने परत जाणार होते. तथापि, एका पोलिसाने त्यांना सामान तपासणीसाठी थांबवले होते. तपासणीवेळी अधिकाऱ्यांना १४ ग्रॅम सोने आणि ३१ हजार रुपयांपेक्षा अधिकची रोख रक्कम आढळली, पोलिसांनी त्याबाबत केलेल्या विचारणेचे तक्रारदाराने समाधानकारक स्पष्टीकरण दिले.
तरीही, तक्रारदाराला एका खोलीत नेले. तेथे त्याला धमकावून, शिवीगाळ करून कोऱ्या कागदावर सही करण्यास भाग पाडले. आरोपी पोलिसांनी तक्रारदाराकडून ३० हजार रुपये उकळले .तक्रारदाराने राजस्थानला परतल्यानंतर आरोपींविरुद्ध पैसे उकळलल्याची तक्रार नोंदवली.
