आंदोलनाची धास्ती; विद्यार्थी भूमिकेवर ठाम

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांंनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर आता निर्बंध घालण्यात आले आहेत.

वसतिगृहात भाषणे करणे, गाणी म्हणणे याला बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची पत्रके वाटणे, भित्तीपत्रके लावणे यासाठीही बंदी घालण्यात आली आहे. वसतिगृहात कोणीही बाहेरची व्यक्ती रात्री १० नंतर थांबू शकणार नाही असे नियम करण्यात आले आहेत. वसतिगृह अधिक्षकांनी नियमावली विद्यार्थ्यांंना मेल केली आहे.

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांंनी राष्ट्रविरोधी आणि समाजविघातक कृत्यांमध्ये भाग न घेण्याची तंबी विद्यार्थ्यांंना देण्यात आली आहे.  या नियमावलीत ‘अँटी नॅशनल’ असा शब्द वापरण्यात आला असून त्याबाबत विद्यार्थ्यांंमध्ये नाराजी आहे.

‘विद्यार्थ्यांंनी नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात भाग घेतल्यामुळेच त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे विद्यार्थ्यांंचे म्हणणे आहे. ‘विद्यार्थ्यांंनी त्यांचे म्हणणे मांडणे हे राष्ट्रविरोधी कृत्य कसे असू शकते ?’ असा प्रश्न विद्यार्थ्यांंनी उपस्थित केला आहे. निर्बंध घातले तरी आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांंनी सांगितले.

कांजूरमार्ग स्थानकात रेल रोको मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई : सीसीए, एनआरसी कायदा आणि ईव्हीएम विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी भारत बंदचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर काही कार्यकर्त्यांनी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात सकाळी रेल रोको केल्याने मध्य रेल्वे वीस मिनिटांसाठी विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. सकाळी ७.५८ वा. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोनवर ४० ते ५० कार्यकर्ते जमले होते. त्यांनी सकाळी ८.०३ वाजता कल्याण ते परळ लोकलला अडविण्याचा प्रयत्न केला. जमावबंदीचे उल्लंघन केल्यावरून  ३३ पुरुष आणि १४ महिलांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी ८.२० वाजता उपनगरी रेल्वे सेवा सुरळीत झाली. मात्र रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.