मुंबई : हवामान विभागाने मुंबईसह ठाणे पालघर भागात आज सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. काही भागात आज दिवसभरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. याचबरोबर सायंकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार ते बुधवार या कालावधीत शहर, तसेच उपनगरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, मुंबईत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची, तर काही भागात गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यावेळी वारे ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहतील. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार,कोकण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमापर्यंत, तसेच विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक, केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातही वादळी पावसाचा इशारा
मागील चार दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. आजही अनेक भागात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, आहिल्यानगर, सांगली, पुणे, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, तसेच विदर्भातील नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा अंदाज कुठे
वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता
नाशिक, सातारा
वादळी पाऊस, दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
अहिल्या नगर, पुणे
वादळी वाऱ्यासह पाऊस ,सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट)
कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा
पुढील दोन – तीन दिवसांत मोसमी वाऱ्यांची वाटचाल
नैऋत्य मोसमी वारे मंगळवारी अंदमानमध्ये दाखल झाले. पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा काही भाग, तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे, अंदमान समुद्राचा उरलेला भाग आणि मध्य बंगालाच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी वारे वाटचाल करतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मोसमी पाऊस २७ मे रोजी केरळमध्ये !
यंदा केरळमध्ये २७ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तवला. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यतः १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर पावसाचे आगमन होऊ शकते (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान). यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.