मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीने उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. आता मुंबईसह ठाणे, पालघर, तसेच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात पावसाने हजेरी लावली. पावसाचा अंदाज असला तरी काही भागात उन्हाचा तापही आहे. उकाडा आणि उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक भागात तापमानाचा पारा ३५ अंशापुढे नोंदला जात आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे.
दरम्यान, रविवारपर्यंत मुंबईसह ठाणे, पालघर भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. कर्नाटक किनारपट्टीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाची शक्यता आहे.
एकीकडे तापमानात वाढ झाली आहे. अशातच पावसाने हजेरी लावली तर तापमानात घट होऊन काहीसा दिलासा मिळू शकतो. पहाटे किंचित गारवा आणि दिवसभर उकाडा असे काहीसे वातावरण सध्या मुंबईकर अनुभवत आहेत. त्यामुळे पाऊस पडलाच तरी दिलासादायक वातावरण निर्माण होईल. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३४.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.
डहाणू येथे सर्वाधिक तापमानाची नोंद
डहाणू येथे गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला येथे ३४.९ अंश सेल्सिअस, अमरावती ३५.२ अंश सेल्सिअस आणि ब्रह्मपुरी येथे ३६.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
