मंगल हनवते

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळींज येथील गृहप्रकल्पातील घरांची विक्री होत नसल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, आता या प्रकल्पातील शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्ज विक्री – स्वीकृती, वितरण प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
कोकण मंडळाने बोळींजमध्ये सुमारे दहा हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. यातील अंदाजे नऊ हजार घरे बांधून पूर्ण झाली असून यापैकी सुमारे सहा हजार घरांची विक्री झाली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासह विविध समस्या असल्याने प्रत्यक्षात अंदाजे २१०० घरात रहिवाशी राहत आहेत. तर, दुसरीकडे या प्रकल्पातील दोन हजारांहून अधिक घरांची विक्री झाली नाही. या घरांसाठी दोन ते तीन वेळा सोडत काढूनही यश आले नाही. अखेर मंडळाने मे २०२३ च्या सोडतीत येथील २ हजार ४८ घरांचा समावेश ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत केला. त्यानंतरही मेमधील सोडतीतही शंभर ते दीडशे घरांची विक्री झाली. त्यामुळे कोकण मंडळाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर मंडळाने या घरांच्या विक्रीसाठी एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार बोळींजमधील ‘प्रथम प्राधान्य तत्त्वा’वरील घरांसाठी अर्ज विक्री – स्वीकृती आणि घराचे वितरण ही प्रक्रिया कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या सोडतीत २ हजार १२२ घरांचा समावेश करण्यात येणार आहे. या घरांचा ‘प्रथम प्राधान्य योजने’त समावेश असेल. मात्र प्रतिसादाअभावी विक्री न होणाऱ्या घरांसाठी अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.