भारतीय नौदलाची आयएनएस ‘सिंधुघोष’ ही पाणबुडी मुंबईच्या नौदल गोदीत प्रवेश करत असताना शुक्रवारी सायंकाळी गाळात रुतून बसली. मात्र असे असले तरी या पाणबुडीवरील सुमारे सत्तर कर्मचारी सुखरूप असल्याचे नौदलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. भारतीय नौदलाच्या बाबतीत गेल्या सहा महिन्यांत घडलेली ही चौथी दुर्घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही पाणबुडी शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास नौदल गोदीत प्रवेश करणार होती. मात्र तेथपर्यंत पोहोचण्यात पाणबुडीस विलंब लागला. तोपर्यंत ओहोटी सुरू झाली होती. पाणबुडीचा बहुतांश भाग हा पाण्याखाली असतो. समुद्रातील पाण्याची पातळी खाली गेल्याने ओहोटीचा फटका बसून ही पाणबुडी गाळात रुतण्याची घटना घडली. पाणबुडीवरील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
या बातमीला नौदलाच्या सूत्रांनी दुजोरा दिलेला नसला तरी हाती आलेल्या माहितीनुसार पाणबुडी गाळात रुतली तेव्हा पाणबुडीवर पाणतीरांसह पूर्ण शस्त्रसाठा होता. मात्र कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
गेल्या वर्षी आयएनएस ‘सिंधुरक्षक’ या नौदलाच्या पाणबुडीवर पाणतीरांचा स्फोट झाल्यानंतर पाणबुडीने समुद्राचा तळ गाठला होता. या पाणबुडीवर १८ कर्मचारी होते. त्यापैकी ११ जणांचे मृतदेह मिळाले तर अन्य सात जणांचा अद्याप तपास लागलेला नाही. तसेच ही पाणबुडी अद्यापही समुद्राच्या तळाशी असून तिला पाण्याखालून बाहेर काढण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेली ही दुर्घटना भारतीय नौदलासाठी मोठय़ा नामुष्कीची ठरली होती. त्यानंतर तातडीने सर्व पाणबुडय़ांची तपासणी करून त्या सुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. त्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी ‘सिंधुघोष’च्या बाबतीत घडलेल्या घटनेला महत्त्व आहे.
भारतीय नौदलाकडे असलेल्या पाणबुडय़ांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी आहे. त्यात ‘सिंधुरक्षक’ पाणबुडीच्या दुर्घटनेमुळे मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यात आता ‘सिंधुघोष’ ही गाळात रुतून राहिल्यास पाणबुडय़ांच्या बाबतीत भारतीय नौदलापुढे मोठा पेच निर्माण होईल. दरम्यान या दुर्घटनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही नौदलाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.