ताशी २५० कि.मी.चा वेग अन् ९० मीटरची जीवनरेषा!

भारतीय नौदलातील ही सर्वाधिक अद्ययावत आणि ध्वनीच्या दुप्पट (मार्क टू) वेगाने जाणारी लढाऊ विमाने आहेत.

भारतीय नौदलातील ही सर्वाधिक अद्ययावत आणि ध्वनीच्या दुप्पट (मार्क टू) वेगाने जाणारी लढाऊ विमाने आहेत. अर्थात सुरक्षेच्या कारणास्तव ४० हजार फूट उंचीवर असतानाच हा वेग गाठला जातो. ‘आयएनएस विक्रमादित्य’ या भारतीय नौदलाच्या बलशाली विमानवाहू युद्धनौकेवर उतरताना या विमानांचा वेग ताशी २५० किलोमीटर्सचा असतो.. हाच तो कसोटीचा क्षण असतो विमानवाहू युद्धनौकेच्या लढाऊ वैमानिकासाठी.. ‘मिग२९ के’च्या मागे असलेला हूक युद्धनौकेवर असलेल्या तीन अ‍ॅरेस्टर वायरपैकी एकात अडकावाच लागतो.. तो अडकला की, त्यानंतर ९० मीटर्सवर विमान थांबते. ही ९० मीटर्सची रेषा आमच्यासाठी जीवनरेषाच असते!.. ‘आयएनएस विक्रमादित्य’वर असलेल्या मिग २९केच्या ताफ्यातील लढाऊ वैमानिक थिओफेलस सांगत होते.
फोटो गॅलरी: ‘आयएनएस विक्रमादित्य’ प्रथमच मुंबई भेटीवर
यंदाच्या वर्षी १४ जून रोजी सर्वाधिक बलशाली ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही विमानवाहू युद्धनौका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीत नौदलात दाखल झाली. आजवरची ही सर्वाधिक अद्ययावत अशी विमानवाहू युद्धनौका असून त्यावरील जवळपास सर्वच यंत्रणा या नव्या आणि अद्ययावत आहेत. ‘मिग २९ के’चा २४ लढाऊ विमानांचा ताफाही नवीन आहे. ही स्वनातीत (मार्क वन) म्हणजे ध्वनीच्या वेगाहून अधिक वेगाने जाणारी विमाने आहेत. पण ‘मिग२९के’चा विशेष म्हणजे ही ध्वनीच्या दुप्पट वेगाने (मार्क टू) जाण्याची क्षमता राखतात. ‘आयएनएस विक्रमादित्य’वर प्रथमच विमाने थांबविण्यासाठी अ‍ॅरेस्टर वायरचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यासाठीच या सर्व ताफ्यातील वैमानिकांना रशियामध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले. कॅप्टन थिओफेलस यांचे तब्बल ५०० तासांचे उड्डाण झाले आहे. रशियातील प्रशिक्षणानंतर ते ‘मिग२९के’चे यशस्वी उड्डाण करत आहेत. त्यांचे सहकारी व मिगच्या ताफ्यातील इतर वैमानिकांपैकी कमांडर रजत कुमार आणि लेफ्टनंट कमांडर विकास नरवल यांनीही अरेस्टर वायरच्या सहाय्याने केले जाणाऱ्या लँिडगचाच विशेष उल्लेख केला. कमांडर रजत कुमार म्हणाले की, विमानाचे इंजिन उतरत असताना आम्ही सुरूच ठेवलेले असते. तीनही हूक चुकले तर आम्ही तयारच असतो. पुढे गेल्यानंतर आम्ही तसेच पुन्हा धावपट्टीवरून त्याच वेगात उड्डाण करतो.. ‘पण अरेस्टर वायर नेमके अडकेल, अशा प्रकारे लँडिंग करणे हेच आमचे प्रमुख धेय्य असते’, लेफ्टनंट कमांडर नरवल म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ins vikramaditya completes a year with the indian navy