मुंबई : कबुतरखाने बंद करण्याला विरोध, कोल्हापुरातील हत्तीणीच्या पाठवणीविरोधात छेडलेले आंदोलन, विलेपार्ले येथील अनधिकृत मंदिरावरील कारवाईबद्दलची तीव्र प्रतिक्रिया, मासळीबाजार बंद करण्यासाठीची सक्रिय धडपड, मनसेविरोधात मीरा-भाईंदरमध्ये निघालेला मोर्चा… गेल्या काही वर्षांत जैन समाजाने आपली भूमिका मांडण्यासाठी घेतलेला आक्रमक पवित्रा चर्चेचा विषय ठरत आहे. वरकरणी विशिष्ट मुद्द्यांबाबतच्या या आक्रमकतेने जैन समाजाच्या राजकारणाला धार प्राप्त झाल्याचे निरीक्षण आहे.
राज्यात जैन धर्मियांचे अनेक छोटे-मोठे समुदाय आहेत. यात मराठीभाषक जैन समाजाचाही मोठा वर्ग आहे. सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, मराठवड्याच्या काही भागांत हा मराठी जैन समाज विखुरलेला आहे. विदर्भात धाकड जैन समाज मोठ्या प्रमाणात आहे तर, मुंबई महानगरात गुजराती जैन समाज प्रामुख्याने स्थिरावला आहे. व्यापार, व्यवसायात आघाडीवर असलेला हा समाज आतापर्यंत राजकीयदृष्ट्या कधीच आक्रमक नव्हता. शाकाहारी विरुद्ध मांसाहारी
मुंबईत सुमारे २० वर्षांपूर्वी शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा वाद उद्भवला होता. त्याला जैन समाजाच्या आहारसंहितेची किनार होती. या समाजाच्या पवित्र पर्युषण पर्वादरम्यान मीरा-भाईंदरमध्ये पालिकेकडून मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यामागेही या समाजाची आग्रही पण छुपी भूमिका होती. परंतु, गेल्या काही वर्षांत हा समाज अधिक आक्रमकपणे आणि खुल्या पणाने आपली भूमिका मांडू लागला आहे.
नागरी आरोग्याच्या कारणास्तव मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली. मात्र, त्याविरोधात जैन समाजाने मोहीम छेडली आहे. मुंबईत रविवारी या मुद्द्यावरून शांती मोर्चाही काढण्यात आला. विशेष म्हणजे, भाजपचा कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या या समाजाने कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात त्या पक्षाला दूषणे दिली आहेत.
कोल्हापुरातील जैन समाजाच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला ‘वनतारा’ प्राणी संग्रहालयात हलवण्यात आल्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांत जैन समाजाचा आवाज मोठा आहे. या विरोधात सर्व स्तरांतील कोल्हापूरकर एकवटले असले तरी त्याचे नेतृत्व मराठी जैन समाजातील नेतेमंडळी करत आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात रविवारी मोठी पदयात्राही काढण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार दिल्याबद्दल एका दुकानदाराला मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ तेथील व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चातही जैन समाजातील व्यापाऱ्यांचा पुढाकार होता. विलेपार्ले येथील अनधिकृत मंदिरावर कारवाई झाल्यानंतरही हा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. याखेरीज मांसाहार करणाऱ्यांना गृहसंकुलांत परवानगी नाकारण्याचे प्रकार सुरूच आहेत. ताडदेव भागातील मासळी बाजाराविरोधात स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे जैन समाजाच्या आक्रमकेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या समाजातील नेते आणि प्रतिष्ठित मंडळींनी याचा इन्कार केला आहे. दोन-तीन घटनांवरून हा समाज आक्रमक झाला, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे निवृत्त सरकारी अधिकारी जयप्रकाश संचेती यांनी म्हटले तर, माजी खासदार राजू शेट्टीही ‘रस्त्यावर उतरणे म्हणजे राजकारण नव्हे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करतात.
जैन समाज शांत, संयमी, अहिंसक आहे, पण, तितकाच जागृत आहे. त्यामुळे चुकीला चूक म्हणण्याची ताकद त्यांच्यात आहे. विलेपार्ले येथील जैन मंदीर पाडण्यात आले. मंदिर बांधल्यानंतर आरक्षण टाकण्यात आले होते. बांधकाम व्यावसायिकाच्या हितासाठी मंदीर पाडण्यात आले. पवित्र मूर्ती, ग्रंथांचे नुकसान झाले. ब्रिटिश काळापासून सुरू असलेले कबुतरखाने बंद करण्याची गरज काय? नांदणी येथील हत्तीण परत येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. – राजू शेट्टी, माजी खासदार.
मुंबई व काही ठराविक भागात हे प्रकार घडले आहेत. कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय आणि सर्व भाषिकांनी आंदोलनात भाग घेतला आहे. जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे. काही अतिउत्साही युवकांमुळे सरसकट समाजाला दोष देणे चुकीचे ठरेल. – जयप्रकाश संचेती, निवृत्त सरकारी अधिकारी.