राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर आता पक्षाचा अध्यक्ष कोण, पक्ष व पक्षचिन्ह कुणाचं यावरून वाद सुरू आहे. हा वाद थेट केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला आहे. त्यावर आयोगाने सुनावणी सुरू केली आहे. याच सुनावणीतील एका प्रसंगावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड शनिवारी (७ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेतच भावूक झालेले पाहायला मिळाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला त्या वकिलाचं बोलणं ऐकून असं वाटलं की, आपण कशासाठी लढत आहोत. कुठली नीती, कुठली मुल्ये. हे घरात बसल्यानंतर शरद पवारांनी फोन करून सांगितलं की, तुम्हाला अमूक अमूक मंत्री केलं आहे, जा शपथविधी करा. याचं शरद पवारांना काय फळ मिळालं, तर ते हुकुमशाह आहेत.”

“एवढंच होतं तर शरद पवारांना सोडून जाताना त्यांना…”

“शरद पवार हुकुमशाहासारखे वागतात आणि त्यांनी पक्षात लोकशाहीच जीवंत ठेवली नाही, हे वाक्य महाराष्ट्रातील एका माणसाला तरी पटतं का सांगावं. एवढंच होतं तर शरद पवारांना सोडून जाताना त्यांना सांगायचं होतं की, तुम्ही लोकशाहीवादी नाहीत. आम्हाला तुमच्या पक्षात राहायचं नाही. आम्ही स्वतंत्र पक्ष काढतो आणि स्वतंत्रपणे हा पक्ष चालवतो,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ पाहा :

“वकिलांमार्फत जे बोलण्यात आलं ते सहन न होणारं”

“शरद पवारांच्या हातातील पक्ष वाढला, मोठा झाला. आता हे तो पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तोपर्यंतही राजकारण म्हणून समजू शकतो. मात्र, काल निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाच्या वकिलांमार्फत जे बोलण्यात आलं ते सहन न होणारं होतं. ज्यांनी शरद पवारांकडून सगळं घेतलं त्यांना इतकं असंवेदनशील होणं शोभत नाही,” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.