मुंबई : नारळी पौर्णिमेनिमित्त आज (दि. ८ रोजी) मुंबईत शासकीय, निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत.

नारळी पौर्णिमा मुंबई, ठाणे परिसरात मोठ्याप्रमाणात साजरी केली जाते. ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली होती. राज्य सरकारने मुंबईतही सुट्टी जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत. सरकारने यापूर्वीच्या आदेशानुसार गोपाळकाला (दहिहंडी)साठी १६ ऑगस्टला तर अनंत चतुर्दशीसाठी ६ सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र या दोन्ही सुट्ट्या शनिवारी येत आहेत. राज्यात शनिवार-रविवारी शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे या दोन्ही सुट्टया बदलून नारळी पौर्णिमा सणासाठी उद्या शुक्रवारी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर ज्येष्ठगौरी विसर्जनासाठी २ सप्टेंबरला मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई शहर व उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर केल्याने मुंबईतील बँका, वित्तीय सेवा वा केंद्र सरकारच्या कार्यालयांना ही सुट्टी लागू नसेल. बँका, शेअर बाजार उद्या सुरू राहील.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संबंधित परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. नियोजित वेळापत्रकानुसार शुकवारी सकाळच्या सत्रात औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) आणि एम.एड., तर दुपारच्या सत्रात एम.ए. आणि एम.कॉम.च्या परीक्षा होत्या.