मुंबई : मुंब्रा येथे लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर अशा दुर्घटनांवर तोडगा म्हणून स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल चालविण्याच्या निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. कमी वायुविजनची समस्येमुळे सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे नव्या रचनेची सामान्य लोकल तयार केली जाणार असून ही लोकल जानेवारी २०२६ रोजी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
मुंब्रा येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री, रेल्वे मंडळाचे अधिकारी आणि इंटिग्रल कोच फॅक्टरीशी (आयसीएफ) सविस्तर बैठक झाली. मुंबईतील सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या प्रस्तावावर व्यावहारिक उपाय शोधणे हा यामागील उद्देश होता. सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवल्यास त्यामुळे वायुवीजन कमी होऊन प्रवासी गुदमरतील. ही गंभीर समस्या असून त्यावर नवीन उपाय शोधण्यात आला आहे. सामान्य लोकलच्या रचनेत बदल करून, हवा खेळती राहील, अशा पद्धतीची रचना केली जाईल.
स्वयंचलित दरवाज्यांना लूव्हर्स (हवेशीर पट्ट्या) असतील. त्यामुळे या लूव्हर्समधून हवा खेळती राहिल. डब्यामध्ये ताजी हवा पंप करण्यासाठी लोकलच्या छतावर वेंटिलेशन युनिट असतील. तर, सामान्य लोकलचे डबे हे एकमेकांना जोडले जातील. म्हणजे ज्याप्रकारे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाडीच्या पहिल्या डब्यामध्ये चढल्यास शेवटच्या डब्यापर्यंत जाता येईल. तसेच, लोकलच्या एका डब्यामध्ये चढल्यास, दुसऱ्या डब्यामध्ये जाणे शक्य होईल. यामुळे गर्दी विभाजित करण्यास शक्य होईल. या नवीन रचनेची पहिली लोकल नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत तयार होईल. तर, आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्रानंतर ती जानेवारी २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल केली जाईल. मुंबई उपनगरी रेल्वे सेवांसाठी तयार केल्या जाणाऱ्या २३८ वातानुकूलित लोकल व्यतिरिक्त या लोकल असतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.