मुंबई : म्हाडाशी संबंधित कोणत्याही तक्रारींच्या निवारणासाठी म्हाडा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली म्हाडात दर महिन्याला लोकशाही दिन आयोजित केला जातो. या लोकशाही दिनात मोठ्या संख्येने तक्रारदार सहभागी होत आपल्या तक्रारींचे निवारण करुन घेत आहेत. आता म्हाडाशी संबंधीत सर्व विभागीय मंडळातही लोकशाही दिनाच्या धर्तीवर जनता दिन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विभागीय मंडळातील मुख्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जनता दिन आयोजित करून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा जनता दिन महिन्यांतून दोनदा आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे आता मंडळाशी संबंधित तक्रारी थेट त्या मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडविता येणार आहेत. त्यामुळे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळाच्या माध्यमातून म्हाडाने १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार केला आहे. त्या अंतर्गत अनेक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तर चालू प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा नुकताच जयस्वाल यांनी घेतला. कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या प्रकल्पांची प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता तात्काळ घेऊन एका आठवड्यात निविदा प्रसिद्ध कराव्यात. प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया राबविताना नवीन निर्णयानुसार निविदेचा कालावधी कमी ठेवावा, असे आदेश यावेळी जयस्वाल यांनी मंडळांना दिले. तसेच म्हाडाच्या सर्व कार्यालयांत स्वच्छता मोहिम राबवून त्याच्या कार्यवाहीचा अहवाल छायाचित्रांसह पाठवण्याचे आदेशही त्यांनी सर्व मंडळांना दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आपापल्या विभागीतील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय प्रकल्पांना भेटी देत प्रकल्पांचा आढावा अहवाल सादर करण्यासही त्यांनी यावेळी सांगितले.

म्हाडाशी संबंधित नागरिकांच्या अनेक तक्रारी, समस्या असतात. या तक्रारी, समस्यांच्या निराकरणासाठी दररोज मोठ्या संख्येने वांद्रयातील म्हाडा भवनात नागरिक येतात. अशावेळी प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे जलद आणि योग्य निराकरण व्हावे यासाठी सर्व विभागीय मंडळाने महिन्यातून दोनदा जनता दिन आयोजित करावा असे आदेश जयस्वाल यांनी दिले. त्यानुसार आता महिन्यातून दोनदा म्हाडात जनता दिन आयोजित केला जाणार असून आता नागरिकांच्या तक्रारींचे निवारण सोपे होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचप्रमाणे दूर राहणार्या नागरिकांच्या सोयीसाठी दूरदृष्य प्रणालीची सुविधाही उपलब्ध करुन देण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले आहेत. दरम्यान म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांविरोधात एका महिलेने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावेळी तिने गळ्यात पैशांची माळ घालून पैशांची उधळण केली होती. महिला म्हाडाची लाभार्थी वा अर्जदार नसली तरी म्हाडाच्या ११ अर्जदारांच्यावतीने ती महिला अधिकाऱ्यांकडे तक्रार निवारणासाठी पाठपुरावा करत होती. मात्र आपणास अधिकाऱ्यांकडून दाद मिळत नसल्याचा आरोप करत तिने आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर जनता दिन आता महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र तक्रारदार म्हाडाचा लाभार्थी, अर्जदार असणे गरजेचे असणार आहे. त्रयस्थ व्यक्तींच्या माध्यमातून अर्ज करत कोणालाही जनता दिनात सहभागी होता येणार नसल्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.