मुंबई : विधीमंडळात पैसे घेऊन प्रवेशपत्र दिले जाते. असे प्रवेशपत्र देणारी टोळी कार्यरत आहे. वेळनिहाय आणि प्रवेशद्वारनिहाय वेगवेगळे दर आहेत. अशा प्रकारे बेकायदा प्रवेशपत्र दिले जात असल्यामुळे विधीमंडळात गर्दी होते, हाणामारी होते, अशी टीका शशिकांत शिंदे आणि अनिल परब यांनी विधान परिषदेत केली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामारीच्या घटनेवर सविस्तर चर्चेची मागणी केली. सत्ताधारी पक्षाचा आमदार मारहाण करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला उसकवत असल्याचे दिसून येते. पोलिस आरोपीला तंबाखू मळून देत असल्याचे चित्रफितीत दिसत आहे, असेही दानवे म्हणाले.
शशिकांत शिंदे यांनाही या विषयावर चर्चेची मागणी केली. सदस्यांमधील वैयक्तिक द्वेष, दुश्मनी वाढली आहे. विधिमंडळाच्या बाहेर दिसणारे चित्र आज आवारात दिसले आहे. आमदार सना मलिक यांनी विधीमंडळातील गर्दीतून वाट काढणे अवघड होत असल्याचे म्हटले आहे. विधिमंडळातील प्रवेशपत्राचा दर पाच हजार रुपये इतका आहे. सभापतींनी प्रवेशपत्र देणे बंद करण्याचे निर्देश दिले होते, तरीही प्रवेशपत्र कसे दिले गेले. सभापतींच्या निर्देशांनंतरही विधिमंडळात गर्दी कशी होते. मंत्र्यांनी प्रवेशपत्र दिले नाही तर पैसे देऊन प्रवेशपत्र मिळवून कार्यकर्ते पास मिळवितात. त्यामुळेच गर्दी होते, असा आरोपही शिंदे यांनी केला.
विधिमंडळाच्या कार्यालयाची इज्जत जावू नये, म्हणून आम्ही गप्प आहोत. सर्रास पैसे घेऊन बेकायदा प्रवेशपत्र दिले जाते. असे बेकायदा प्रवेशपत्र देण्याची पद्धत काय आहे. कोणत्या गेटमधून जाण्यासाठी किती पैसे घेतले जातात. याचे पुरावे देण्यास तयार आहे, आमचे आरोप आम्ही प्रतिज्ञापत्राद्वारे देऊ शकतो, असे अनिल परब म्हणाले. परब यांच्या आरोपला उत्तर देताना, परब यांनी पैसे घेऊन प्रवेशपत्र दिले जात असल्याचे पुराव्यासह मांडावे सरकार त्याची चौकशी करेल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.