मुंबई : गेल्या आठवड्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोसळधारांमुळे अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला. पाऊस कमी झाला असला तरी पावसाने झालेल्या नुकसानामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात म्हणजेच १८ ते २४ सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात झाला असून, आठवड्याभरात तेथे ३७६ टक्के इतका पाऊस झाला आहे.

मराठवाड्यात १८ ते २४ सप्टेंबर या कालावधीत ४२.६ मिमी पाऊस अपेक्षित असतो. तेथे या कालावधीत १०७.९ मिमी पाऊस पजला आहे. म्हणजेच १५३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्रात ४१.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. तेथे ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच ६९ टक्के अधिक पाऊस पडला आहे. विदर्भात मात्र या कालावधीत कमी पाऊस पडला आहे. तेथे ३०.४ मिमी पाऊस अपेक्षित असला तरी २२ मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच २८ टक्के पावसाची तूट आहे. तर, संपूर्ण राज्यात १८ ते २४ सप्टेंबर या कालावधीत ४२.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र, ६७.७ मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच संपूर्ण राज्यात ५८ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला आहे.

मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात १८ ते २४ सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस नोंदला गेला आहे. तेथे ३७६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात १८७ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला. सोलापूर येथे १६५ टक्के, अहिल्यानगर १६१ टक्के, छत्रपती संभाजीनगर १२५ टक्के, जळगाव १०८ टक्के, हिंगोली १४३ टक्के, लातूर १३९ टक्के, नांदेड ८२ टक्के, परभणी ७२ टक्के, नाशिक ८९ टक्के तर धुळे येथे ५० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. धुळे वगळता इतर सर्व जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

सध्याची परिस्थिती

मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी तेथील पूरस्थिती आटोक्यात आलेली नाही. नदीला पूर आल्यामुळे अनेकांची शेती, गुरे वाहून गेली आहेत. अनेकांना जीवदेखील गमवावे लागले आहेत. दरम्यान, सध्या मोसमी पावसाला वातावरण अनुकूल असल्यामुळे या भागात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.