मुंबई : सध्या मोसमी पाऊस सक्रिय झाला असून गेल्या तीन चार दिवसांपासून कोकणासह इतर काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात सोमवारी अतिमुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) इशारा तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोकण, तसेच घाट परिसरात मागील दोन – तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या २४ तासांत पालघर भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तसेच कोकणातील इतर भागात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालमधील कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरात आणि दक्षिण कर्नाटक किनारपट्टीवर समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दरम्यान, कोकणसाह, घाट परिसर आणि पूर्व विदर्भात सोमवारी अतिमुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढून मोठ्या प्रमाणावर ढग निर्मिती होईल. तसेच पेरूजवळ प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान १७ अंश सेल्सिअस, तर इक्वेडोरजवळ २१ अंश सेल्सिअस इतके कमी असल्यामुळे तेथे हवेचा दाब अधिक राहील. त्यामुळे संपूर्ण बाष्प भारताच्या दिशेने येऊन पावसाची शक्यता निर्माण होईल.

कोकणात आठवडाभर पाऊस

हा संपूर्ण आठवडा कोकणात मुसळधार पाऊस पडेल. दररोज तेथे ४० ते ६० मिमी पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात ६ ते १४ मिमी पाऊस, विदर्भात ७ ते २० मिमी, पश्चिम महाराष्ट्र २ ते १५ मिमी आणि मराठवाड्यात १ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्यांची दिशा नैऋत्येकडून राहील.

आज पावसाचा अंदाज कुठे

अति मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

मुसळधार पाऊस (येलो अलर्ट)

मुंबई, पालघर,ठाणे, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

जळगाव, छत्रपती संभाजीनगर