मुंबई : गेल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला होता. या आठवड्याच्या सुरुवातीलाच पावसाळी वातावरण निवळले असून किमान तापमानासह कमाल तापमानातही झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे आता गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत होता. त्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली. काही भागात तापमानात वेगाने घसरण सुरू झाली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात किमान तापमानात वेगाने घट व्हायला सुरुवात झाली आहे.
मधले दोन दिवस वगळता आता पुन्हा किमान तापमानासह कमाल तापमानात घट होत आहे. मुंबईतही कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. मात्र, गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी २३.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २१.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
याचबरोबर नाशिक येथे १३.४ अंश सेल्सिअस, सांगलीत १८ अंश सेल्सिअस, जळगावमध्ये १० अंश सेल्सिअस, बीडमध्ये १३.५ अंश सेल्सिअस, परभणीमध्ये १४.४ अंश सेल्सिअस आणि डहाणू येथे १९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
गेले काही दिवस महाराष्ट्रात पावसाचे सावट होते. मात्र, आता पावसासाठी असणारी स्थिती निवळली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात धुक्याचे प्रमाण वाढत आहे. किमान तापमानात देखील वेगाने घसरण होत आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
थंडी टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्य व्यापेल असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, विदर्भ आणि इतर काही भागात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके कमी झाले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पहाटे आणि रात्री उशिरा हवेत गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे.
