मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६६ टक्के मतदान झाले आहे. गतवेळच्या तुलनेत यंदा पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. तीन दशकानंतर राज्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे आता वाढलेली मते नेमकी कुणाच्या पारड्यात गेली आणि याचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला, याची उत्कंठा आहे.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ६१.२९ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीतही राज्यात मतदानाची टक्केवारी ६१.१ होती. या दोन्हीच्या तुलनेत यावेळी पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक ७६.२५ टक्के मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. त्याखालोखाल ७५.२६ टक्के मतदान गडचिरोली जिल्ह्यात झाले आहे. सर्वांत कमी ५२.०७ टक्के मतदान हे मुंबई शहर जिल्ह्यात झाले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार नगर (७१.७३), बुलढाणा (७०.६०टक्के), चंद्रपूर (७१.२७टक्के), हिंगोली (७१.१०टक्के), जालना (७२.५३टक्के), नंदुरबार (७०.५१टक्के), परभणी (७०.३८ टक्के), सांगली (७१.८९ टक्के), सातारा (७१.७१ टक्के), यवतमाळ (७०.८६ टक्के) या दहा जिल्ह्यांनी सात दशकी टक्केवारी गाठली आहे.

हेही वाचा :मालवण येथील शिवपुतळा दुर्घटना : बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील कुलाबा (४४.४४ टक्के) हा सर्वांत कमी मतदान झालेला मतदारसंघ ठरला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात ५५.७७ टक्के तर ठाणे जिल्ह्यात ५६.०५ टक्के मतदान झाले आहे. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले तेव्हा ७१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सर्वाधिक मतदान हे या वेळी झाले आहे.