मुंबई : मुंबईसह, राज्यभरातील मॉल्समध्ये आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मॉलची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या ९० दिवसांत सर्व मॉलनी अग्निसुरक्षेचे परीक्षण पूर्ण करावे, असे आदेश सर्व महापालिकांना दिले आहेत. मात्र, त्यानंतरही सुरक्षा निकष पूर्ण न केल्यास संबंधित मॉलची वीज व पाणी जोडणी तोडण्यात येईल, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिला.
राज्यातील विविध शहरातील मॉलच्या अग्निसुरक्षेत अनियमितता आढळते. यामुळे मॉलना लागणाऱ्या आगीचे प्रमाण वाढत असल्याचा मुद्दा सदस्य कुपाल तुमाने यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. यावर बोलताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मागील वेळेस मॉलला लागलेल्या आगीनंतर ७५ मॉलच्या अग्निसुरक्षा तपासणीचे आदेश दिले. त्यापैकी २६ मॉलना नोटीस दिली. परंतु नोटीस देऊनही काही उपयोग होत नसल्याचे सांगताना त्यांच्यावर फौजदारी कारवाई का केली जात नाही, असा सवाल केला. याला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईतील मॉलला मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगी संदर्भात यापूर्वीच मुंबई महापालिकेने सर्व मॉलचे अग्निपरीक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत.
कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाते. ७५ मॉलपैकी ५ ते ६ मॉलवर कडक कारवाई केली जात असून उर्वरित मॉल बंद असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. आता यापुढे मॉलमधील अग्निसुरक्षेसंदर्भात कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्व वर्ग ‘ब’, ‘क’, ‘ड’ महापालिकांनी मॉल्सच्या अग्निसुरक्षा तपासण्यांसंदर्भात सर्व महापालिकांना आदेश दिले आहेत. निकष पूर्ण न केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईलस असे मंत्री सामंत यांनी सांगितले.