मुंबई : ‘अनेक वर्षे मी गिरगावचा नागरिक आहे. नागरिकांच्या सोयी-सुविधा यासाठी स्थानिक आमदार आणि मंत्री म्हणून मी सातत्याने कार्यरत आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही कोणताही व्यावसायिक स्वार्थ आडवा आणलेला नाही व यापुढेही येणार नाही. साहित्य संघाच्या इमारतीच्या पुनर्विकासात माझा वैयक्तिक वा व्यावसायिक सहभाग नाही,’ असे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

‘गिरगावचा साहित्य संघ यापुढे मराठी राहणार का?’ या ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तावर खुलासा करताना लोढा यांनी साहित्य संघाच्या इमारतीच्या पुनर्विकासात आपला काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले.

‘साहित्य संघाने याच वर्षी मला मानद सदस्यत्व बहाल केले होते. यातून मी मतदानाचा हक्क बजाविला. त्यात चुकीचे काय,’ असा सवाल त्यांनी केला आहे. यापूर्वीही गिरगावातील अनेक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात मी केवळ स्थानिक नागरिकांच्या हितासाठी नि:स्वार्थी सहकार्य केले आहे. यात माझा कोणताही व्यावसायिक सहभाग नाही, असेही लोढा यांनी म्हटले आहे.