Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange मुंबई : शनिवारी लोकलला फार कमी गर्दी असते. मात्र मराठा आंदोलकांच्या गाड्यांमुळे मुंबईच्या वेशीवरच वाहतूक कोंडी झाल्याने अनेक आंदोलकांनी लोकलने आझाद मैदान गाठण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ठाणे, कल्याण, वाशी, पनवेल येथून येणाऱ्या दुपारी १२ वाजताच्या दरम्यान लोकल लोकल प्रवाशांनी तुडुंब भरून धावत होत्या.
एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत शनिवारी मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईमध्ये धडकत होते. त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यातच आंदोलकांच्या अनेक गाड्या या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या होत्या. त्यामुळे आंदोलकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून रेल्वेने थेट आझाद मैदान गाठण्याला प्राधान्य दिले. अनेक आंदोलकांनी कल्याण, ठाणे, वाशी, पनवेल येथे लोकल पकडली. लोकलमध्ये मराठा आंदोलकांनी एकच गर्दी झाली होती. त्यामुळे शनिवार असूनही मध्य व हार्बर मार्गावरील गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. या गर्दीमधून कामावर जाणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले होते.
दुपारच्या वेळी लोकल विलंबाने मध्य रेल्वे मार्गावर आंदोलकांची गर्दी वाढत असताना ऐन दुपारी १२ वाजता मध्य रेल्वे तब्बल पाऊण तास विलंबाने धावत होती. त्यामुळे लोकलमध्ये अधिकच गर्दी वाढल्याने प्रवासी हैराण झाले होते.
लहान मुले व महिलांना त्रास
शनिवार असल्याने अनेक नागरिक हे दुपारी गणपतींचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडले होते. यामध्ये महिला व लहान मुलांचे प्रमाण अधिक होते. मात्र लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे लहान मुले व महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.