Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झालेले राज्यभरातील मराठा आंदोलकांपैकी मोठ्या संख्येने दुसर्या दिवशीही मुंबईच्या पर्यटनात रमले. गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, ताज हॉटेलसमोर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमा झालेले दिसले. यावेळी तरुण आंदोलक गेटवे ऑफ इंडिया येथे ढोलताशाच्या ढेक्यावर थिरकताना दिसले.
राज्याच्या कानाकोपर्यातून त्यातही मराठवाड्यातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत. शनिवारीही राज्याच्या कानोकापर्यातून आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणार्या ठाणे खाडी पूल, अटल सेतू, पूर्वमूक्त मार्गावर शनिवारीही प्रचंड वाहतूक कोंडी होती. आझाद मैदानात चिखल असल्याने अशात मुंबईत दाखल झालेले अनेक आंदोलकांनी पर्यटनाला प्राधान्य दिले.
नरिमन पॉईंट, गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी आंदोलकांनी गर्दी केली. गेटवेला सेल्फी काढण्यात, छायाचित्र काढण्यात, व्हिडिओ काढण्यात आंदोलक दंग दिसले. काही आंदोलक तर गेटवे ऑफ इंडियाला ढोलताशाच्या तालावर थिरकताना दिसले. महत्त्वाचे म्हणजे जगभरातल्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेटवे ऑफ इंडियासमोरच्या ताज हॉटेल पाहण्यासाठीही पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. इतकेच नव्हे तर काही आंदोलक थेट हॉटेलमध्ये गेल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.
शुक्रवारी,आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलक नरिमन पॉईंटला आणि आझाद मैदानाच्या आसपास फिरत होते. आझाद मैदानावर चिखल असल्याने, पावसामुळे गैरसोय असल्याने आंदोलक पर्यटन करत होते. तर शनिवारीही मोठ्या संख्येनेही आंदोलक पर्यटन करताना दिसले.