मुंबई : राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय व सामाजिक वातावरण पेटलेले पाहायला मिळाले. त्यानंतर विविध स्तरातून विरोध वाढल्यानंतर त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मराठीच्या विजयी मेळाव्याचे वरळीतील एनएससीआय डोम येथे आयोजन करण्यात आले आहे.
तेथे मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी व सदस्य, मराठी कलाकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष बाब म्हणजे जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथकाने सहा थरांचा मानवी मनोरा रचत मराठी भाषेला सलामी दिली.
इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली. या घोषणेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देत मोर्चात सहभागी होण्याचे ठरवले. मात्र हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याने याविरोधात पुकारण्यात आलेला मोर्चा रद्द झाला. यानंतर मराठीचा विजयी मेळावा घेण्याचे ठाकरे बंधूंकडून निश्चित झाले. या मेळाव्याला राजकीय रंग चढवू नये, हा मेळावा मराठीच्या विजयाचा असून मराठीप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधूंना एकाच व्यासपीठावर पाहण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरळीसह आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठीच्या विजयी मेळाव्यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्ष, विविध संघटना आणि मराठीप्रेमी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. कोणी मराठीशी संबंधित विविध मजकूर लिहिलेले तसेच बाराखडी असलेले टी-शर्ट घालून आले आहे. तसेच अनेकांच्या डोक्यावर ‘मी मराठी’ लिहिलेली टोपी पाहायला मिळत आहे. लेझीम व बँड पथकाचा ताल आणि मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असो, मराठी शिक, नाहीतर निघ…आदी विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला आहे. तसेच मेळाव्यापूर्वी एनएससीआय डोम येथे मराठी लोकसंगीताचे सादरीकरणही होत आहे.