मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर बुधवारी समाज कंटकांनी लाल रंग फेकल्याची घटना घडली. अशीच घटना १८ वर्षांपूर्वी घडल्याच्या आठवणीला अनेक शिवसैनिकांनी उजाळा दिला. त्यावेळी शिवसैनिकांमध्ये खूप राग उफाळून आला होता व अनेक ठिकाणी जाळपोळ झाली होती. सेना भवन परिसरात शिवसैनिकांनी बस जाळली होती. मात्र त्यावेळच्या गुन्हेगारांचा अद्याप शोध लागलेला नाही, अशी खंत शिवसैनिकांनी व्यक्त केली.
दादर येथील शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर बुधवारी सकाळी काही समाजकंटकांनी लाल रंग फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शिवसेनेतील (ठाकरे) शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. सकाळीच मोठ्या संख्येने सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी, कार्यकर्ते तेथे जमू लागले होते. या घटनेमुळे शिवसैनिकांच्या मनातील एका जुन्या जखमेवरची खपली निघाली. अठरा वर्षांपूर्वीही अशाच पद्धतीने मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला काही समाजकंटकांनी काळे फासले होते. मीनाताई ठाकरे यांचे निधन होऊन सुमारे ३० वर्षे उलटून गेली आहेत.
शिवसैनिकांच्या मनात मीनाताईं ठाकरे यांच्यासाठी वेगळे स्थान आहे. पहिल्यांदा ही घटना घडली तेव्हा मुंबईत शिवसेनेची मोठी ताकद होती. संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यावेळी ठिकठिकाणी जाळपोळ केली होती. त्यावेळचे उपविभागप्रमुख अशोक केळकर यांच्यावर याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या सगळ्या घटनेची आठवण शिवसैनिकांना आजच्या घटनेनंतर झाली. त्यावेळच्या समाजकंटकांचा अद्याप शोध लागलेला नाही, अशीही खंत काहींनी व्यक्त केली.
साडेसहापर्यंत काहीही आक्षेपार्ह नव्हते
ही घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर बराच काळ दादर परिसरात तणावाचे वातावरण होते. सकाळी साडेसहापर्यंत पुतळ्यावर कोणतेही डाग नव्हते, अशी माहिती काही शिवसैनिकांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली. पोलीस दर दिवशी या विभागातील काही विशिष्ट संवेदनशील जागांची पाहणी करतात. तोपर्यंत या ठिकाणी काहीही आक्षेपार्ह नव्हते, असे काही शिवसैनिक म्हणाले.
चार लीटर थीनर
समाजकंटकांनी बुधवारी पुतळ्यावर मोठ्या प्रमाणावर लाल रंग टाकला होता. पुतळ्यावरील लाल रंगाचा ऑईल पेंट काढण्यासाठी तब्बल चार लीटर थिनर वापरण्यात आले. शाखाप्रमुख अजित कदम आणि माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी हा रंग घासूनपुसून काढून टाकला.
एकाही सीसीटीव्हीत पुतळा दिसत नाही
या परिसरात पोलिसांचे आठ ते नऊ सीसी टीव्ही कॅमेरे असून या कॅमेरांमध्ये शिवाजी पार्कचा परिसर दिसतो. मात्र एकाही कॅमेरात मीनाताईं ठाकरे यांचा पुतळा दिसत नाही, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. त्यामुळे या परिसरातील अन्य खासगी सीसीटीव्ही कॅमेरे शोधण्याचे कामही सुरू आहे. त्याकरीता शिवसैनिकांची मदत घेतली जात आहे. मात्र राजकीय वादांमुळे कोणीही रहिवासी, दुकानदार याबाबत पुढे येत नसल्याचीही खंत शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.