Maharashtra Mega Recruitment On Compassionate Grounds: गेल्या काही वर्षांपासून अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या आणि विविध विभागातील लिपिकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आला असून लवकरच सुमारे १० हजार बेरोजगारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. मुंबईत एका शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर पालकमंत्र्यांच्या हस्ते सबंधित जिल्हयातील पात्र उमेदवारांना नोकरीचे पत्र देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
शासकीय अथवा निमशासकीय संस्थेतील एखाद्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाले तर त्यांच्या वारसाला त्याच विभागात नोकरी देण्याचे अनुकंपा तत्वावरील नोकरीचे धोरण राज्यात सन १९७६ पासून राबविले जात आहे. या धोरणानुसार गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी ही अनुकंपा तत्वावरील नोकरीची सवलत आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून अनुकंपा नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे तब्बल ९ हजार ६५८ उमेदवार नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ५०६ उमेदवार नांदेड जिल्ह्यातील असून पुणे जिल्हयातील ३४८, गडचिरोलीमधील ३२२तर नागपूर जिल्ह्यातील ३२० उमेदवारांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये ५ हजार २२८, महापालिका, नगरपालिकामध्ये ७२५ तर जिल्हा परिषदांमध्ये ३ हजार ७०५ जणांची अनुकंपा तत्वावरील नियुक्ती रखडलेली होती. या सर्व जागा भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या १७ जुलैच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानुसार सध्याच्या प्रक्रियेत सुधारणा करुन अनुकंपा नोकरीसाठी मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नोकरीसाठी एक वर्षात अर्ज करण्याचे बंधन वाढवून तीन वर्ष पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच अनुकंपासाठीची ४५ वर्षे कमाल वयोमर्यादा असून त्यानंतर उमेदवाराचे प्रतिक्षा यादीतून नाव रद्द होत असे. आता एखाद्या उमेदवाराला ४५ वर्षांपर्यंत नोकरी मिळाली नाही तर त्या कुटुंबातील अन्य व्यक्तीला नोकरीचा हक्क देण्यात आला आहे. पूर्वी प्रतिक्षा यादीतील उमेदवाराला नाव बदल करता येत नव्हते मात्र आता कटुंबातील उमेदवाराचे नांव बदलता येईल.
तसेच एखाद्या कुटुंबाला अनुकंपा नोकरी योजनेची माहिती नसल्याने तीन वर्षात अर्ज करता आला नाही तरी त्या कुटुंबाला दोन वर्षांपर्यंत विलंब क्षमापित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यभर अनुकंपा भरती मोहीम राबविण्यात आली असून त्यात ५ हजार १८७ उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ५ हजार १२२ उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे एकूण १० हजार ३०९ उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
नियुक्तीपत्र वाटपाचा मुख्य कार्यक्रम मुंबईत होणार असून तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शि्ंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते तर जिल्हास्तरावर सबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही नियुक्तीपत्र दिली जाणार होती. मात्र मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आता हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.