मुंबई : गेल्या आठवड्यात राज्यातील सर्वच भागात पावसाने उघडीप दिली होती. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर रविवारनंतर या भागात पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असून काही भागांतच समाधानकारक पाऊस झाला आहे.
राज्यातील इतर काही भागात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात रविवारपासून पाऊस जोर धरेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार कोकणतील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. तसेच सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही मुसळधार पावसाची, तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला दिलासा
विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, परभणी या भागामधील शेतीला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
पावसाची अनियमितता
राज्यात यंदा मोसमी पाऊस विस्कळीत स्वरूपात सुरू आहे. जून महिन्यात काही भागांना पावसाने झोडपले असले तरी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात पावसाची अनियमितता स्पष्ट दिसून आली आहे.
कमी दाबाचे क्षेत्र
कोकण किनारपट्टीवरील भागात सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती मंदावलेली असून कर्नाटक, केरळ किनारपट्टीला वारे सक्रिय झाले आहेत. याचबरोबर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाचे क्षेत्र, तसेच कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर वारे सक्रिय झाल्याने सध्या राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात २४ जुलैपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.