मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. रविवारी पहाटेही काही भागांत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. ही प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई शहर तसेच उपनगरांत शनिवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला. काही भागांत रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. पुन्हा रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ६.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ५.४ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी सायंकाळी दादर, प्रभादेवी, परळ,वांद्रे, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ येथे पाऊस झाला.
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात सोमवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग , कोल्हापूर, पुणे, सातारा भागात अतिमुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी वारे स्थिरावलेलेच
मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागांत दाखल झाल्यानंतर र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा रविवारीही कायम होती. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याने दोन ते तीन दिवसांत विदर्भासह, छत्तीसगड आणि ओडिशामधील काही भागांसह पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार, तसेच गुजरातमध्ये मोसमी वाऱ्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे.