मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता रस्ते सुधारणांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता पालघर ते आसनगाव आणि पुढे अहमदाबाद आणि नाशिक प्रवास वेगवान करण्यासाठी दोन नवे रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मनोर ते वाडा आणि कंचड फाटा ते कुडूस असे हे रस्ते आहेत. या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तसेच व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एमएमआरडीएने निविदा जारी केली आहे.

एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रोचे जाळे विणले जात आहे. तर भुयारी मार्ग, सागरी मार्ग, पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण असे अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. आता यापुढे जाऊन एमएमआरमधील जुन्या, दुरावस्था झालेल्या रस्त्यांची नव्याने बांधणी करण्यावर भर दिला आहे. अगदी इतर सरकारी यंत्रणेकडील रस्त्यांच्या बांधकामासाठी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून मुंबई ते नाशिक महामार्गावरील साखळी क्रमांक ५४३ वर एक वाहन भुयारी मार्ग बांधून ठाणे ते कल्याण आणि नाशिक ते कल्याण प्रवास वेगवान करण्याचा निर्णय घेत त्यादृष्टीने अंमलबजावणी सुरू केली आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत अंजुरफाटा ते चिंचोटी अशा २८ किमीच्या रस्त्याची नव्याने बांधणी करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. याबरोबरीनेच पालघर ते आसनगाव प्रवास सुकर करण्यासाठी मनोर ते वाडा आणि कंचड फाटा ते कुडूस रस्त्याची बांधणी करण्याचाही निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – काद्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी; CM शिंदे म्हणाले, “कांदा उत्पादकांना आम्ही…”

हेही वाचा – शिंदे गटाच्या व्हिपमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, “याचा अर्थ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोर ते वाडा आणि कंचड फाटा ते कुडूस असा एकूण अंदाजे ४०.५० किमीचा हा रस्ता असून त्यासाठी १६५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी, तसेच प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याकरीता एमएमआरडीएने निविदा जारी केली आहे. दरम्यान, मनोर ते वाडा आणि कंचड फाटा ते कुडूस रस्ता आणि अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्ग यांची नव्याने बांधणी झाल्यास नाशिक आणि गुजरातला जाणे सोपे होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.