Video : अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन; म्हणाले, “येत्या ११ डिसेंबरला…!”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्यांनी राज्यातल्या जनतेला आवाहन केलं आहे.

amit thackeray video appeal
अमित ठाकरेंचा जनतेला आवाहन करणारा व्हिडीओ व्हायरल!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकांसाठी पक्षाची मोट बांधण्याचा यातून प्रयत्न करत असल्याचा तर्क काढला जात आहे. मात्र, एकीकडे राज ठाकरे पक्षीय बांधणीवर भर देत असताना त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला एका वेगळ्याच गोष्टीसाठी साद घातली आहे. अमित ठाकरेंचा एक व्हिडीओ मनसे पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर शेअर केला जात असून त्यामध्ये अमित ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये स्वत: अमित ठाकरे राज्यातल्या जनतेला आवाहन करताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीविषयी अमित ठाकरेंनी या व्हिडीओमध्ये चिंता व्यक्त केली असून त्यासाठी आता फक्त सरकारवर अवलंबून न राहाता आपल्यालाच जबाबदारी घेणं गरजेचं आहे, असं देखील अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

“आपण कुठेतरी कमी पडतोय…”

आपल्या व्हिडीओमध्ये अमित ठाकरेंनी राज्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. “मी तुमच्यासमोर मनातला महत्त्वाचा मुद्दा घेऊन येतोय. तो म्हणजे आपले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुरक्षित करणं.. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं की परदेशातले समुद्रकिनारे इतके स्वच्छ आणि सुंदर का असतात? आणि तसे आपल्या राज्यातले समुद्रकिनारे का नसतात? आपले समुद्रकिनारे इतके अस्वच्छ आणि भकास का दिसतात? त्यामुळे आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायला हवा”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

अमित ठाकरेंची जनतेला साद

राज्याच्या समुद्रकिनाऱ्यासाठी अमित ठाकरेंनी जनतेला साद घातली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर किनाऱ्यावर सलग साडेचार वर्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला. आता अशीच मोहीम मनसे आख्ख्या महाराष्ट्रात राबवणार आहे. राज्यातल्या ४० पेक्षा जास्त समुद्रकिनाऱ्यांवर येत्या ११ डिसेंबरला सकाळी १० ते दुपारी १ च्या मध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे”, असं अमित ठाकरेंनी सांगितलं.

“तुम्हालाही आपल्या जवळचे समुद्रकिनारे स्वच्छ असावेत असं वाटत असेल, तर तुमच्या जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन तुम्ही या मोहिमेत सहभागी होऊ शकता”, असं ते या व्हिडीओत म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mns chief raj son amit thackeray video appeal for maharashtra sea shore cleaning pmw