मुंबई : आंध्र प्रदेशमधील किनाऱ्यावर नवीन कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, यामुळे मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, हा कमी दाबाचा पट्टा १५ ऑगस्टपर्यंत त्याच परिसरात स्थिर राहील आणि त्यानंतर पश्चिम – उत्तर – पश्चिमेकडून छत्तीसगडमार्गे सरकेल.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला होता. काही ठिकाणी तापमान ३५ अंशापुढे नोंदले गेले होते. यामुळे पावसाळ्यात उकाडा आणि उन्हाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. दरम्यान, आंध्र प्रदेश किनाऱ्यावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आजपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. यानुसार आज अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मेडन ज्युलिअन ऑक्सिलेशन
कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल जलद होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर सद्यस्थितीत मेडन ज्युलिअन ऑक्सिलेशन (एमजेओ) हा एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. एमजेओ फेज ३ आणि त्यानंतर फेज ४ मध्ये जाण्याचा अंदाज आहे. यामुळे मोसमी पाऊस कोकण, घाटमाथ्यावर सक्रिय राहण्याची शक्यता आहे. एमजेओ हे नैऋत्य मोसमी वाऱ्यांना प्रभावित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
महिनाअखेरीस कमी दाब क्षेत्र
ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत दोन ते तीन सलग कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात महिनाअखेरीस चांगल्या पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून घाटमाथ्यावर आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडेल.
पाऊस कधी, कुठे ?
मराठवाडा, पुणे आणि मध्य महाराष्ट्रात १३ ते २० ऑगस्टदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे येथे १४ ते २० ऑगस्टदरम्यान सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. याचबरोबर लातूर, नांदेड, सोलापूर, संभाजीनगर आणि मराठवाड्यातील प्रमुख भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात आजपासून पुढील चार ते पाच दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहील. त्यामुळे काही भागात आज सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज पावसाचा अंदाज कुठे
मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा घाट परिसर, जालना, परभणी बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव
अतिमुसळधार पावसाचा इशारा
यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा
हलक्या सरी
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर