मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात विविध कंपनीच्या भाडेतत्वावरील बसचा समावेश करण्यात आला असून, या बसवर कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. कमी मासिक वेतनात जादा काम, महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरण यामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत. त्यामुळे ‘समान कामासाठी समान वेतन’ या मागणीसाठी संप करावा की करू नये याबाबत बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात आले. मतमोजणीअंती बहुसंख्य कंत्राटी कर्मचारी संपावर जाण्याचा कौल दिला. लवकरच संपाबाबत रणनीती ठरविण्यात येण्याची चिन्हे आहेत.

बेस्ट उपक्रमातील डागा ग्रुप, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्स, बी.व्ही.जी. इंडिया व इतर खासगी कंपन्यांमार्फत बेस्टच्या एकूण ताफ्यापैकी ८३ टक्के बसचे व्यवस्थापन केले जाते. परंतु, या कंपनीअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बेस्टमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचे वेतन भिन्न आहे. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात सार्वजनिक बस सेवा देण्यासाठी कायम सेवेत असलेल्या कामगारांचे आणि खासगी कंपन्याद्वारे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे काम तंतोतंत सारखेच आहे.

तसेच हे काम बारा महिने, कायम स्वरुपाचे असल्याने व काम कायम चालणारे असल्याने, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामाला साजेसे वेतन मिळायला हवे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमामधील कायम आणि नियमित कामगारांना लागू असलेले वेतनमान व इतर सेवाशर्ती तातडीने लागू करावे, अशी मागणी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने केली आहे.

संप करावा की करू नये, यासाठी मतदान

‘समान कामासाठी समान वेतन’ मिळविण्याच्या मागणीसाठी संघर्ष कामगार कर्मचारी युनियन संपावर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, याबाबत बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने मतदान पार पडले. ८ जुलै रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. त्यानंतर २२ जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आणि उर्वरित आगारात २७ जुलै रोजी कामगारांचे मतदान झाले.

निकाल काय लागला

मतदानाची मतमोजणी ३१ जुलै रोजी करण्यात आली. एकूण ५,९९८ कर्मचारी असून ५,०५१ जणांनी मतदान केले. संप करण्यासाठी ४,९८६ जणांनी कौल दिला, तर संप करू नये यासाठी ७ जणांनी मत दिले. तर, ५८ मते बाद झाली.

कोणत्या आगारात मतदान पार पडले

बेस्ट उपक्रमातील बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वडाळा, आणिक, प्रतीक्षा नगर, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, धारावी, कुर्ला, सांताक्रूझ, मालवणी, मागाठाणे, मजास या आगारात मतदान पार पडले.

पुढील रणनीती ७ ऑगस्ट रोजी ठरणार

बेस्ट उपक्रमातील सर्व आगारांमध्ये तीन टप्प्यात तंत्राटी कर्मचाऱ्यांनी मतदान केले. ५,९९८ कर्मचाऱ्यांपैकी ५,०५१ कामगारांनी मतदानात सहभाग घेतला. या निकालानंतर पुढील भूमिका ७ ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरविण्यात येईल, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.