मुंबई : मुसळधार पावसाने रविवारी मुंबईसह ठाणे, पालघरला झोडपून काढले. महामुंबईतील मुख्य नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. परिणामी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनांनी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. तसेच येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत काही ठिकाणी पाणी साचल्याने दुपारपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. मुंबईत शनिवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर होता आणि रविवारी पहाटेपर्यंत कायम होता. शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० पर्यंत कुलाबा येथे १२०.८ मिमी, जुहू ८८ मिमी, सांताक्रूझ ८३.८ मिमी, वांद्रे ८२.५ मिमी आणि आणि महालक्ष्मी येथे २८ मिमी पावसाची नोंद झाली. याआधी २६ सप्टेंबर २०२४ रोजी २४ तासांत सांताक्रूझ येथे १७०.३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

– बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच राज्यात पावसाने जोर धरला. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत मात्र गेले काही दिवस तुरळक सरी कोसळत होत्या. शनिवारी सायंकाळपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

– रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसाची संततधार होती. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आदी भागांना सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. शनिवारी रात्री बदलापूरमध्ये एक व्यक्ती वाहून गेली.

उल्हास, भातसा नद्या धोकादायक पातळीवर

ठाणे जिल्ह्यातही रविवारी संततधार होती. त्यामुळे उल्हास आणि भातसा या प्रमुख नद्यांनी अनुक्रमे मोहने (कल्याण) आणि सापगाव (शहापूर) येथे धोकादायक पातळी ओलांडली. त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दुपारी कोकणातील मुंबईसह चार जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

पावसाचा आजचा अंदाज

अतिमुसळधार : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट परिसर

मुसळधार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक , सातारा घाट परिसर

मेघगर्जनेसह : अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर