मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) श्री रामेश्वरम – तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा पर्यटकांच्या खिशाला परवडणारी असून आरामदायी सेवा मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ‘नवरत्न’ सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) भारत गौरव पर्यटक रेल्वेमार्फत श्री रामेश्वरम – तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा या विशेष धार्मिक पर्यटन सहलीचे आयोजन केले आहे. ही विशेष यात्रा १० दिवसांची असणार आहे. दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन या यात्रेमध्ये घडवले जाणार आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नाशिक येथून सुरू होऊन १६ नोव्हेंबर २०२५ रोजी समाप्त होईल.

यात्रेतील प्रमुख स्थळे

तिरुपती – वेंकटेश्वरनस्वामी मंदिर आणि पद्मावती मंदिर

रामेश्वरम् – रामनाथस्वामी मंदिर व धनुषकोडी मदुराई – मीनाक्षी मंदिर

कन्याकुमारी – विवेकानंद रॉक मेमोरियल, गांधी मंडपम व कन्याकुमारी मंदिर

तिरूवनंतपुरम – पद्मनाभस्वामी मंदिर व कोवलम समुद्र किनारा

नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी या स्थानकांतून प्रवाशांना चढता आणि परतीच्या वेळी उतरता येईल.

तिरुपती बालाजी मंदिर दर्शनासाठी पर्यटकांना दर्शनाची तिकिटे स्वतंत्रपणे ऑनलाइन आरक्षित करावी लागतील, असे आयआरसीटीसीद्वारे सांगण्यात आले.

या सहलीचे शुल्क प्रौढांसाठी प्रति व्यक्ती १८,०४० रुपयांपासून आहे. तर, ५ ते ११ वर्षांच्या मुलांसाठी १६,८९० रुपये आहे. या शुल्कात शयनयानमधून प्रवास करता येईल. तर, वातानुकूलित तृतीय श्रेणीतून प्रौढांसाठी ३०,३७० रुपये आणि बालकांसाठी २९,०१० रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीतून प्रौढांसाठी ४०,२४० रुपये आणि बालकांसाठी ३८,६१० रुपये असे शुल्क आकारण्यात येईल. यात रेल्वेच्या आरक्षित तिकिटासह निवासाची सोय, शाकाहारी जेवण, मार्गदर्शक, पर्यटनस्थळी पर्यटकांना ने – आण करण्यासाठी बसची सुविधेचा समावेश आहे.

आयआरसीटीसीच्या प्रत्येक सहलीची आणि दौऱ्याची माहिती, त्याचे तपशील, किंमत आणि आरक्षण प्रक्रियेची सविस्तर माहिती आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.