मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, राज्यामध्ये शनिवारी ८६ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या १ हजार ३६२ वर पोहोचली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या ६४० इतकी झाली आहे.
राज्यामध्ये शनिवारी सापडलेल्या ८६ करोनाबाधितांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ३१, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील २८, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील ७, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ६, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या हद्दीतील ४, नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ३, काेल्हापूर महानगरपालिका, सांगली आणि सातारा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात जानेवारी २०२५ पासून एकूण १६ हजार २२६ करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १ हजार ३६२ जण बाधित आढळले. आतापर्यंत ७४९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, ५९५ रुग्ण सक्रिय आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.