मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर शुक्रवारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे महायुतीची प्रचाराची सांगता सभा होणार आहे. या सभेला पंतप्रतधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे एकाच मंचावर असतील. या सभेबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता असून या सभेला सुमारे सव्वालाख नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज असून त्यादृष्टीने सभेचे नियोजन करण्यात आले आहे. मैदानावर सुमारे ७५ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार असून मैदानाबाहेर मोठ्या स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या तुलनेत तीनपट अधिक गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी येत्या २० मे रोजी मुंबईत मतदान होत आहे. मतदानाला आता अवघे चार दिवस शिल्लक असून प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आरोप – प्रत्यारोपांना आता धार आली आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांनी अर्ज दिले होते. त्यामुळे कोणाला सभेसाठी परवानगी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र नगरविकास विभागाने १७ मे रोजी सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लेखी परवानगी दिली होती. त्यामुळे १७ मे रोजी महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा शिवाजी पार्कवर होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीसाठी उमेदवार उभे केलेले नाहीत. मात्र भाजप बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांची ही सभा महायुतीला पाठिंबा दर्शवणारी असणार हे निश्चित आहे.
हेही वाचा…मुंबई : अंधेरीत २२ मे रोजी १६ तास पाणीपुरवठा बंद, आसपासच्या विभागांतील पाणीपुरवठाही खंडित होणार
या सभेसाठी मैदानावर ७५ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून सभेला सुमारे सव्वालाख नागरिक उपस्थित राहतील, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला आहे. तीन पक्षांचे कार्यकर्ते, मतदार या सभेला येतील त्यामुळे भव्य सभा होईल व याकरीता बाहेरच्या बाजूलाही स्क्रीनची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेनुसार सर्व नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर उपस्थितांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिवाजी पार्क मैदानासमोरील वनिता समाज, सावरकर स्माकर येथे महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठी वाहनतळाची सोय केली आहे. तर इतर वाहनांसाठी वडाळा पाच उद्यान, सेनापती बापट मार्ग, माहीम रेतीबंदर येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन व्यवस्था म्हणून हिंदुजा रुग्णालयात काही खाटा आरक्षित केल्या आहेत. तसेच मैदानाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती किल्लेदार यांनी दिली.
हेही वाचा…मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पावसाची शक्यता
या अटींवर मैदानाला परवानगी
ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, ध्वनी प्रदूषणाच्या कायद्याचे पालन करावे, उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करावे, आवश्यक तेथे पोलिसांची परवानगी घ्यावी, या अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे.