मुंबई : पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता, डोंगरावरून वाहत येणारा पाण्याचा लोंढा, आदींमुळे भूस्खलन होण्याचा धोका लक्षात घेऊन विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या ठिकाणी डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, स्थलांतर न करता तेथेच वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे एन विभागाचे सहायक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पावसाळ्यादरम्यान दरडी कोसळण्याची, डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची, तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात.

हेही वाचा : लग्नाचा खर्च परत मिळविण्यासाठी जावयाचे अपहरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एन विभाग कार्यालय हद्दीतील विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या भागांतील धोकादायक इमारतींना / झोपड्यांना एन विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना / नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.