देशभर सक्रिय झालेल्या मान्सूनने मुंबईत मात्र, धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईत अखंडपणे पाऊस कोसळत असून, शनिवारपासून जोर वाढला आहे. लोकल सेवेसह रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम होत असून, बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. मुंबईशहरासह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळत असून, सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मुंबईकरांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईत मंगळवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. रात्री ८.३० वाजेपर्यंत राम मंदिर येथे ७८ मिमी असा २४ तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. कु लाबा येथे कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २५.५ मिमी नोंदवले गेले. तसेच सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३१.१ आणि कि मान तापमान २५.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मुंबई, मुंबई उपनगरं, ठाणे, नवी मुंबईत बुधवारी पहाटेपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला. सकाळपासून पावसाची संततधार कायम असून, महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
#WATCH | Several parts of Mumbai face waterlogging as the region continues to receive rainfall. Visuals from Chembur. pic.twitter.com/HiCH9bUjxR
— ANI (@ANI) July 21, 2021
सकाळी १० वाजेनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे रस्त्यावर धुके पसरल्यासारखं वातावरण तयार झालं होतं. पावसाची संततधार कायम असल्यानं मुंबईतील सायनसह अनेक भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, याचा कोणताही परिणाम प्रवासी रेल्वेवर झालेला नाही.
Maharashtra: Heavy rainfall continues to lash Mumbai, visuals from Wadala.
As per India Meteorological Department’s (IMD) forecast, Mumbai will experience ‘generally cloudy sky with heavy rain’ today. pic.twitter.com/E2gzAd3CmE
— ANI (@ANI) July 21, 2021
हवामान विभागाचा इशारा काय?
पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांत पुढील ३ दिवस तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनापट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.