मुंबई : हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेचा संगम असणारा आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित व आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खानने आपल्या निवासस्थानी एका खास म्युझिकल नाईटचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी अचानकपणे हजेरी लावली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला.
आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित व आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट २००७ मध्ये तिकिट खिडकीवर प्रचंड यश मिळविलेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा स्पिरिच्युअल सिक्वेल आहे. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खानने आपल्या निवासस्थानी एका खास म्युझिकल नाईटचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली तेंडुलकर यांच्यासोबत अचानकपणे हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या म्युझिकल नाईटमध्ये चित्रपटातील १० नवोदित कलाकार आपल्या कुटुंबासोबत सहभागी झाले होते. यावेळी रणबीर कपूर सर्व मुलांबरोबर फोटो काढण्यात मग्न झाले होते. तसेच आमिर खान स्वतःही विशेष मुलांबरोबर वेळ घालवत त्यांचे मनोबल वाढवत होते. चित्रपटाचे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांनीही मुलांसोबत हजेरी लावली आणि सर्वांच्या उत्साहात भर घातली. तर प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा आणि प्रसिद्ध संगीतकार शंकर – एहसान – लॉय यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.