मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक गावांमध्ये पूर आले आहेत. त्यात सर्वाधिक फटका बळीराजाला बसला असून दुष्काळाच्या छायेखाली हतबल झालेले मराठवाड्यातील नागरिक व शेतकऱ्यांना ‘मुंबईच्या राजा’ने मदतीचा हात पुढे केला आहे. गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अनोतान नुकसान झाले आहे. शेतातील पिक आणि जनावरेही वाहून गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असली तरीही शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शेकडो हात पुढे सरसावले आहेत. तसेच, महाराष्ट्रातील देवस्थानांकडूनही आर्थिक मदत केली जात आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी १० कोटी रुपये, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही ५० लाख रुपये मदत देण्याचे घोषित केले आहे. त्यांनतर, आता लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. या मंडळाने यापूर्वीही महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत केली आहे.
देवस्थानांकडून मदत
राज्यातील पूरग्रस्तांसाठी शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानातर्फे १ कोटी ११ लाख रुपये, तुळजाभवानी मंदिराने १ कोटी रुपये दिले आहेत. तसेच, पूरग्रस्त महिलांसाठी १००० साड्या वाटप करण्याची घोषणा तुळजाभवानी मंदिराने केली आहे. शिर्डी साईबाबा संस्थानाकरून पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
विविध घटकांकडून मदतीचा हात
जोगवा, पगार आदींमधून शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून अतिरिक्त मदतीची तरतूद केली जात आहे. त्याचबरोबर समाजातील अन्य विविध घटकही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. पारलिंगी समुदायाने चक्क जोगवा मागून शेतकऱ्यांसाठी निधी उभारला आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, तसेच शिक्षण आयुक्त यांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सर्व शिक्षक संघटनांनी जाहीर केल्यानुसार शिक्षकांचा १ दिवसाचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व विद्यमान आमदार आणि खासदार यांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार या मदतीसाठी देणार आहेत. तसेच, अन्य विविध सामाजिक संस्थांकडूनही शक्य तितकी मदत पूरग्रस्तांना केली जात आहे.