मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला १ जून ते १५ सप्टेंबर दरम्यान व्यावसायिक कामांसाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अमली पदार्थ प्रकरणात आरोपी असलेल्या रिया हिला चित्रीकरण करण्यासाठी श्रीलंका, सर्बिया आणि विविध युरोपीय देशांमध्ये जायचे आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. दातीर यांनी ही परवानगी दिली. रिया ही यापूर्वी देखील न्यायालयाच्या परवानगीने परदेशात प्रवास करत होती आणि तिने जामिनाच्या अटींचे पूर्णपणे पालन केले होते. तिने या अटींचे उल्लंघन केल्याचे एकही उदाहरण नाही, असे न्यायालयाने तिला परदेश प्रवास करण्याची परवानगी देताना नमूद केले.

सुशांत याला अमली पदार्थ खरेदी करून देणे आणि त्यासाठी वित्तपुरवठा करणे या आरोपांतर्गत रिया आणि तिच्या भावाला अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ८ सप्टेंबर २०२० रोजी अटक केली होती. सुशांत याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. यामुळे चित्रपट क्षेत्रातील अमली पदार्थ तस्करीची चौकशी सुरू झाली. मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२० मध्ये तिला जामीन मंजूर केला.

दरम्यान, गेल्या मार्चमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. तसेच, या अहवालात रियाला आरोपमुक्त करण्याची शिफारसही केली होती.

रियाचा दावा

आंतरराष्ट्रीय कंपनीची निर्मिती असलेल्या स्टेप्सन्स एस१च्या चित्रीकरणासाठी आपल्याला परदेशी जाणे आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रवास करण्यास आणि व्हिसा प्रक्रियेसाठी आपले पारपत्र तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करण्याची विनंती रियाने विशेष न्यायालयाकडे केली होती, आपण यापूर्वीही जामीन अटींच्या उल्लंघयाशिवाय परदेश प्रवास केल्याचे रिया हिने अर्जात म्हटले होते.

एनसीबीचा विरोध

मालिकेतील तिच्या भूमिकेची पुष्टी करणारे कोणतीही कागदपत्रे नाहीत आणि ती फरार होण्याची शक्यता व्यक्त करून एनसीबीने तिच्या या अर्जाला विरोध केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाचे म्हणणे

विशेष न्यायालयाने एनसीबीचा युक्तिवाद अमान्य केला. तसेच, रिया ही मुंबईची रहिवासी आहे आणि ती फरारी होण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, तिचे भूतकाळातील वर्तन लक्षात घेऊन तिचा अर्ज मान्य करण्यात येत असल्याचे विशेष न्यायालयाने रिया हिच्या परदेश दौऱ्याला परवानगी दिली. त्याचवेळी, रिया हिने तिच्या परदेशातील वास्तव्याचे पत्ते आणि संपर्क तपशीलांसह तिचा प्रवास कार्यक्रम सादर करण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने तिला दिले.