आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केल्यानंतर मुंबई पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. समीर वानखेडे सध्या मुंबईत क्रूझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. वानखेडे यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चार सशस्त्र रक्षक दिले आहेत. तसेच, वानखेडे आता त्यांच्या नियमित कारऐवजी एसयूव्ही वापरतील. अलीकडेच, समीर वानखेडेंनी त्यांची हेरगिरी केली जात असल्याचा आरोप केला होता. यावेळी मुंबई पोलिसांच्या दोन हवालदारांवर ओशिवरा स्मशानभूमीतून त्याचे सीसीटीव्ही काढल्याचा आरोप आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, “वानखेडे यांच्या सुरक्षेसाठी आणखी चार पोलीस तैनात केले गेले आहेत. तसेच वानखेडे वापरत असलेल्या कारऐवजी त्यांच्या नवीन सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून एक एसयूव्ही देण्यात आली आहे. तसेच दक्षिण मुंबईच्या बॅलार्ड इस्टेटमध्ये असलेल्या एनसीबी कार्यालयाबाहेर तैनात पोलिसांची संख्याही वाढवण्यात आली आहे.”
दरम्यान, दोन पोलीस आपला पाठलाग करत असल्याची तक्रार वानखेडे यांनी सोमवारी दाखल केली होती. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटलंय की, ७ ऑक्टोबर रोजी ते त्यांच्या आईंना दफन करण्यात आलेल्या ओशिवरा येथील स्मशानभूमीत गेले होते, तेव्हा दोन पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला होता आणि त्यांच्यावर नजर ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी समीर वानखेडे यांच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामध्ये दोन पोलीस आणि काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सात दिवसांत तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी वानखेडे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांचीही भेट घेतली. वानखेडे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणाची चौकशीही केली होती.