मुंबई : सीबीएसई, आयसीएसई, आयजी या अन्य मंडळाच्या शाळांमध्ये गणेशोत्सवाची सुट्टी नाकारण्यात येत असून पालक, शिक्षकांबरोबरच आता स्कूल बस चालकांकडूनही राज्यमंडळाच्या शाळांप्रमाणे इतर मंडळाच्या शाळांनीही सुट्टी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. सुट्ट्यांबाबतच्या संभ्रमामुळे शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवासाठी गावाला जाण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शाळा बस चालक संघटनेनेही याविरोधात सरकारला पत्र देऊन विद्यार्थी, कर्मचारी व बसचालकांना सुट्टी देण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण असलेल्या गणेशाेत्सवासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गावाला जातात. त्यामुळे राज्यमंडळाकडून शाळांना पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात येते. मात्र मुंबईसह राज्यात असलेल्या असलेल्या सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि आयजी या अन्य मंडळाच्या शाळांमध्ये मात्र गणेशोत्सवासाठी फक्त गणेश चतुर्थी व अनंत चतुर्दशीची म्हणजेच आगमन व विसर्जनाची सुट्टी दिली जाते.
विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाची सुट्टी मिळत नसल्याने त्यांना गावाला जाता येत नाही. या शाळांतील कर्मचारी व शाळा बस कर्मचारी यांनाही गणेशोत्सवासाठी गावाला जात येत नाही. त्यातच यंदा अन्य मंडळाच्या शाळांनी गणेश चतुर्थीचीही सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
राज्य सरकारने २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक महत्वाचे सण आणि कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यानुसार राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र अन्य मंडळाच्या खासगी शाळांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. राज्य सरकारने २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला लागून पाच दिवस सुट्टी जाहीर केली आहे. मात्र सीबीएसई, आयसीएसई, आयजी या अन्य मंडळाच्या शाळांना यंदा अद्यापपर्यंत गणेश चतुर्थीचीही सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
शाळा बस मालकांनी सर्व खासगी शाळांसाठी गणेशोत्सवाची एक आठवडा सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे विशेषतः महिला बस परिचारिकांना व विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबासह गणेशोत्सव साजरा करणे शक्य होईल. तसेच महाराष्ट्रातील सर्व मंडळाच्या शाळांसाठी एकसंध सुट्टीचे वेळापत्रक लागू करण्यासंदर्भात खासगी शाळांसोबत चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून योग्य मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी स्कूल ॲण्ड कंपनी बस ओनर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.