मुंबई: Mumbai Goa Highway मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून या महामार्गावरील एक मार्गिकाही गणपतीपूर्वी वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी दिली. या महामार्गावरील वाहतुकीतील महत्त्वाचे अडथळे दूर झाल्याने कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 गणपतीपूर्वी या महामार्गावरील कशेडी बोगदा तसेच एक मार्गिका खुली करण्याची घोषणा चव्हाण यांनी विधिमंडळात केली होती. या महामार्गावरील पोलादपूर-खेडदरम्यानचा ९ किलोमीटर लांबीचा कशेडी घाट पार करण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते एक तास लागत असे. मात्र आता या घटात दोन किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आला असून त्यातील एक मार्गिका चव्हाण यांच्या उपस्थितीत वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. या बोगद्यामुळे हा घाट आता केवळ १५ मिनिटांत पार करता येणार असल्याने प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

हेही वाचा >>> बारसूमधील कातळशिल्पे संरक्षित यादीतून वगळली; कशेळीमधील कातळशिल्पांना ‘राज्य संरक्षित स्मारका’चा मान

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत युद्धपातळीवर काम केल्याने हा बोगदा गणपतीपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात यश आल्याने आता गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा होईल. कोकणवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे समाधान असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. या वेळी चव्हाण व कोकण विकास समितीचे पदाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गाच्या एका मार्गिकेचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत गणपतीपूर्वी ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.