मुंबई : कोकणातील नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी हजारापार होण्याचे प्रकार याआधी झाले आहेत. तर, आता गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली असून या रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर, एका मिनिटांत प्रतीक्षा यादी सुरू होते. त्यामुळे बहुसंख्य मुंबईस्थित कोकणवासियांना आरक्षित तिकीट मिळू शकले नाही. तर, काही रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी हजारापार गेल्याने तिकीट मिळणे कठीण झाले आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु, रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने कोकणवासियांना एसटी किंवा खासगी बसचे तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे जादा पैसे आणि प्रवासासाठी अधिक वेळ यात वाया जाणार आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळावे यासाठी रेल्वे प्रशासनाने २५० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. मात्र, या विशेष रेल्वेगाडीचे विशेष शुल्क देऊनही आरक्षित तिकीट मिळत नसल्याने प्रवासी गोंधळात पडले आहेत.

प्रतीक्षा यादीतील तिकीट रद्द केल्यास ६० रुपये भुर्दंड

यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव असून, २५ आणि २६ ऑगस्ट रोजीचे तिकीट काढणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या दिवशी सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची तिकीटे मिळणे कठीण झाले आहे. २४ जुलै रोजी आरक्षित तिकीट मिळण्यासाठी, प्रवासी सकाळी ७.३० वाजेपासून तयारीत होते. सकाळी ८ वाजता तिकीट काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एका मिनिटांत प्रतीक्षा यादीची क्षमता पूर्ण झाल्याने ‘रिग्रेट’ असा संदेश आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर येऊ लागला.

तर, गाडी क्रमांक ०११६७ एलटीटी – सावंतवाडी विशेष रेल्वेगाडीची प्रतीक्षा यादी हजारापार गेली. त्यामुळे ६० टक्के मर्यादेच्या नियमांचे पालन झाले नाही. तर, प्रतीक्षा यादीतील तिकीट अनेकांनी रद्द केली. त्यामुळे प्रत्येक तिकीटामागे ६० रुपये शुल्क आकारण्यात आले. एका कुटुंबातील ४ ते ५ जणांचे तिकीट रद्द केल्यामुळे २४० ते ३०० रुपयांचे नुकसान सोसावे लागले.

प्रवाशांचे म्हणणे काय ?

रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या नियमांचे स्वतःच पालन करायला हवे. अनेकांनी एकत्र प्रयत्न केल्यामुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रतीक्षा यादी मर्यादेपेक्षा जास्त होत असल्यास तिकीट प्रणालीवरील ताण कमी झाल्यावर मर्यादेपुढे गेलेली तिकिटे रद्द करून प्रवाशांना संपूर्ण रकमेचा परतावा द्यायला हवा. यासाठी विभागीय रेल्वे, क्रिस आणि आयआरसीटीसी यांनी एकमेकांकडे बोट न दाखवता एकत्रित काम करणे आवश्यक आहे. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो व आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो, असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले.

मध्य रेल्वेचे काय म्हणते…

एकाचवेळी तिकीट खिडकी, ऑनलाइन संकेतस्थळावरून हजारो तिकीट काढण्यात येत असतात. यावेळी हे संकेतस्थळ विनाव्यत्यय सुरू असते. एकाच वेळी जर एकाच गाडीकरीता एकाच श्रेणीत हजारो प्रवाशांनी तिकीट घेतले, तर प्रतीक्षा यादीतील तिकीट एका क्षणात हजारापार जाऊ शकते. त्यामुळे एकाच क्षणात प्रतीक्षा यादी मर्यादेपेक्षा जास्त वाढते, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले.

कोकण रेल्वेचे म्हणणे काय ?

रेल्वे मंडळाच्या नियमावलीप्रमाणे तिकीट आरक्षण सुरू असते. या आरक्षण प्रणालीत कोणताही मानवी हस्तक्षेप नसून, ती स्वयंचलित असते. तर, प्रतीक्षा यादीतील तिकीट रद्द केल्यास, शुल्क आकारले जाते. त्याची माहिती प्रवाशांना ज्ञात असते, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी सांगितले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.