मुंबई : मुंबई महापालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ जानेवारीला मुंबईत येणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता मिळविण्याचा चंग बांधलेल्या भाजपच्या लढाईचे रणिशग फुंकण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर येत असून, वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानावर त्यांची सभाही होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका निवडणुकीच्या तयारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे लक्ष आहे. त्या दृष्टीने मुंबईकरांसाठी अनेक योजना, प्रकल्प आणि कामांचे निर्णय, भूमिपूजने आणि लोकार्पण कार्यक्रम होणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने महापालिकेमार्फत सुशोभीकरणाची ५०० कामेही हाती घेतली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भांडुप येथे महापालिकेचे अतिविशेषोपचार रुग्णालय (सुपर स्पेशालिटी), सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि मुंबईतील सिमेंट-काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते १९ जानेवारीला करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एमएमआरडीए आणि अन्य शासकीय यंत्रणांमार्फत उभारण्यात येत असलेल्या मेट्रो दोन व सात या टप्प्यांचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या शासकीय समारंभांचा राजकीय वापर? विरोधकांचा आक्षेप

ठाणे येथील कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात आणखी कोणत्या प्रकल्पांची भूमिपूजने आणि लोकार्पण करायचे, याबाबतचा तपशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निश्चित करण्यात येत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबतही राज्य सरकारने निर्णय घेतला असून या कामाचे भूमिपूजनही या वेळी होऊ शकेल का, याचीही चाचपणी करण्यात येत आहे.

“लोकसभा निवडणुकीसाठी ४०० दिवस बाकी, त्यामुळे मुस्लीम समाजापर्यंत…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यकर्त्यांना आवाहन

भाजपकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी

पंतप्रधानांच्या दौऱ्यात भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधानांच्या जंगी स्वागताची आणि सभेची तयारी करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री मुंबईतील भाजप खासदार, आमदार आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi to visit mumbai next week to lay foundation of various projects zws
First published on: 11-01-2023 at 06:23 IST